कर्तव्यदक्षतेचा सन्मान!
शिरपूरचे श्री. संजय पवार राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित
मुंबई, दि. २७ मे (प्रतिनिधी) – यशवंतराव प्रतिष्ठान, मंत्रालय मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी-कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात शिरपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. संजय श्यामराव पवार यांना ‘गुणवंत अधिकारी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांनी सहपरिवार उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकार केला.हा पुरस्कार महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे, राज्यमंत्री श्री. योगेश कदम व प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
श्री. संजय पवार यांनी ग्रामपंचायतींच्या डिजिटलायझेशनपासून ते ग्रामविकासाच्या विविध उपक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे. ग्रामपंचायतींसाठी असलेल्या विविध ऑनलाईन आज्ञावलींचे कामकाज स्वतः पार पाडत त्यांनी प्रशासनाचे डिजिटलीकरण व पारदर्शकता या दिशेने प्रभावी पावले उचलली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीणी ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार मिळाला असून, बोराडी ग्रामपंचायतीस ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यस्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
पंचायत स्तरावरील लेखापरीक्षणातील प्रलंबित प्रकरणांची १०० टक्के वसुली करणे, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये सुसंवाद साधणे, आणि शासन योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागात शासनाचा विश्वास निर्माण करणे, ही त्यांची कर्तव्यनिष्ठा दर्शवणारी ठळक उदाहरणे ठरली आहेत.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तारअधिकारी, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या असून, त्यांच्या निष्कलंक व समर्पित सेवाभावाचीच ही शासन स्तरावर घेतलेली दखल आहे.
त्यांच्या या यशस्वी सन्मानाबद्दल जिल्ह्यातील प्रशासनिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व सहकारी कर्मचारी वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यतत्परतेला मिळालेला हा गौरव शिरपूर तालुक्यासाठीही आणि धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरतो.
कर्तव्यदक्षता, पारदर्शकता व नवोपक्रमशीलतेचा संगम असलेल्या श्री. संजय पवार यांच्या कार्यप्रवृत्तीला सलाम! आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन..
