"वादळी वाऱ्यामुळे शिरपूर तालुक्यात केळी-पपईचे मोठे नुकसान: पंचनामे सुरू, विमा तक्रारींसाठी शेतकऱ्यांना आवाहन"
शिरपूर (दि. ७ मे २०२५):
दि. ६ मे २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीट व पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. करवंद, बाळदे, जातोडे, उंटावद, भोरखेडा, भावेर, खरदे, आढे, सावळदे, पिंपरी, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, अजंदे, वाघाडी, अर्थे, लौकी, टेम्भे बु, तरडी या गावांमध्ये प्रामुख्याने केळी व पपई या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानीची प्राथमिक पाहणी करण्याचे काम संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांनी करवंद व वाघाडी परिसरात स्वतः भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर, तालुका कृषी अधिकारी संजय पवार व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांनी हवामान आधारित फळ पीक विमा (पुनर्रचित योजना) घेतला आहे, त्यांनी आपल्या नुकसानीबाबत 14447 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार सूचना (Intimation) नोंदवावी, जेणेकरून विमा दावा प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकेल.
शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घ्यावा आणि नुकसानभरपाईसाठी वेळेत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
