माशाच्या भाजीवरून वाद! मुलाने केली स्वतःच्या आईची निर्घृण हत्या – थाळनेर पोलिसांची अवघ्या ४ तासांत कामगिरी"

 



"माशाच्या भाजीवरून वाद! मुलाने केली स्वतःच्या आईची निर्घृण हत्या – थाळनेर पोलिसांची अवघ्या ४ तासांत कामगिरी"

शिरपूर, ता. २६ मे:

ताजपुरी (ता. शिरपूर) येथे एक हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या भांडणातून एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईचा लाकडी दांडक्याने मारून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना २४ मे रोजी रात्री घडली असून, आरोपीने खुनानंतर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकत अटक केली.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजपुरी शिवारातील देविसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतात काम करणारा व तेथेच वास्तव्यास असलेला अवलेस रेबला पावरा (वय २५, रा. खैरखुटी, ता. शिरपूर) याने आपल्या ६७ वर्षीय आई टापीबाई रेबला पावरा हिचा खून केला. सदर महिलेने २४ मे रोजी रात्री जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती. ही भाजी कुत्र्याने खाल्ल्यामुळे अवलेस आणि त्याच्या आईमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या अवलेसने लाकडी दांडक्याने आईवर वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती ताजपुरी गावाचे पोलीस पाटील यांनी २५ मे रोजी पहाटे ५.३० वाजता थाळनेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शत्रुज पाटील, पोसई समाधान भाटेवाल आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व मृत महिलेचा नातू निखील रेबला पावरा याने पोलिसांना घटनेचे संपूर्ण तपशील सांगितले. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला शोधण्यासाठी चार विशेष पथके तयार केली.


या पथकांनी शिरपूर टोलनाका, शिरपूर फाटा, आढे आणि वाठोडा शिवारात शोध मोहीम सुरू केली. अखेर माहितीच्या आधारे आरोपी अवलेस पावरा आढे शिवारातील उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शेताच्या चारही बाजूंनी सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


मयत महिलेच्या जावयाच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा क्रमांक ७५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करत आहेत.


सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षकांसह पोहेकॉ संजय धनगर, भषण रामोळे, पो.का. उमाकांत वाघ, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजीत देशमुख, मुकेश पवार, आकाश साळुंखे व होमगार्ड मनोज कोळी, राजू पावरा यांचा समावेश होता.


या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांशी सहजीवनातील तणाव आणि मानसिक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबात होणाऱ्या हिंसक घटनांचे हे भयावह उदाहरण ठरते.














Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने