११वीत प्रवेशासाठी मागितली २० हजारांची लाच; शिक्षक रंगेहाथ अटकेत! गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे शाळेतील उपशिक्षकाची लाचप्रकरणी अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  


११वीत प्रवेशासाठी मागितली २० हजारांची लाच; शिक्षक रंगेहाथ अटकेत!

गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे शाळेतील उपशिक्षकाची लाचप्रकरणी अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


चाळीसगाव (प्रतिनिधी) – "११वी सायन्स वर्गात प्रवेश मिळवून देतो" अशी आमिषे दाखवून तब्बल २०,००० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन उपशिक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिटने यशस्वी सापळा रचत एकास रंगेहाथ अटक केली आहे.


तक्रार आणि पडताळणी

तक्रारदार (वय ४२ वर्ष) हे आपल्या मुलाच्या ११वी सायन्स प्रवेशासंदर्भात २७ मे रोजी मेहुणबारे येथील विद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी उपशिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी संबंधितांनी संस्थेचे सचिव आणि संचालकांच्या सांगण्यावरून प्रवेशासाठी २०,००० रुपये द्यावे लागतील, अन्यथा प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. यानंतर तक्रारदाराने २८ मे रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.


लाच मागणी व सापळा कारवाई

तक्रारीच्या तपासणीदरम्यान, २९ मे रोजी पंचांच्या समक्ष आरोपी गुलाब साळुंखे यांनी तक्रारदाराकडून लाचेची २०,००० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यातून १०,००० रुपये तातडीने आणि उर्वरित १०,००० रुपये प्रवेशाच्या वेळी द्यावेत, असे सांगण्यात आले. आरोपी उल्हास बागुल यानेही तक्रारदारास साळुंखेकडे लाच देण्यास प्रोत्साहित केले.


यानंतर ३० मे रोजी लाचलुचपत विभागाच्या सापळा कारवाईदरम्यान, गुलाब साळुंखे यांनी तक्रारदाराकडून १०,००० रुपये पंचांच्या समक्ष स्वीकारले. ही रक्कम स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये भादंवि व लाच प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


घरझडती व तपास

आरोपी साळुंखे यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास सुरू आहे. त्याचबरोबर आरोपीच्या घराचीही झडती घेण्यात आली असून लाच स्वीकारण्यासंबंधित पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


कारवाईतील अधिकारी आणि पथक

ही कारवाई श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सापळा पथकात पो.हवा. राजन कदम व पो.हवा. संतोष पावरा यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


शिक्षकांवरील भ्रष्टाचाराचा डाग

शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अशा प्रकारे लाचेची मागणी होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. उपशिक्षकाच्या भूमिकेतून भ्रष्टाचाराचे असे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा घटनांनी विश्वासाला तडा जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने