"गोरक्षकांवर वाढते हल्ले चिंतेचा विषय - गोहत्या रोखणे पाप आहे का ? लोक चर्चा - महेंद्रसिंह राजपूत



 "गोरक्षकांवर वाढते हल्ले चिंतेचा विषय - गोहत्या रोखणे पाप आहे का ?

लोक चर्चा - महेंद्रसिंह राजपूत

शिरपूर सारखा शांतता आणि सामाजिक समरसतेचा आदर्श मानला जाणारा तालुका अलीकडच्या काळात चिंतेचा विषय ठरत आहे. प्रत्येक शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये शिरपूर शहर आणि तालुका कसा शांत आहे याची गुण गाण केले जाते. पण अनेक वेळा ही वरवर ची शांतता सिद्ध होते.

तालुक्यात सतत वाढणारी गो तस्करी, शहरात वेळोवेळी आढळणारे गोमांस आणि गाईंची कातडी, आणि आता गोरक्षकांवर समाजकंटकांनी केलेले थेट हल्ले या घटनांनी तालुक्याची नवी काळी बाजू समोर आणली आहे.

गोहत्या हा कायद्याने बंदी असलेला गुन्हा आहे. महाराष्ट्र गोरक्षा कायदा (१९७६) आणि त्यानंतर लागू झालेल्या कडक तरतुदींनुसार गायींची कत्तल ही पूर्णपणे निषिद्ध आहे. मात्र, तरीही तालुक्यात गो तस्करीचे प्रमाण वाढले आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे — कुठे तरी यंत्रणाच अकार्यक्षम आहे. काही ठिकाणी तर या प्रकारांना छुपा राजकीय किंवा आर्थिक पाठिंबा मिळतो का, हाही गंभीर प्रश्न निर्माण होतो.

गो तस्करीचा व्यवसाय एका संगठित टोळीच्या रूपात फोफावतो आहे, ज्यांना वेळोवेळी 'हप्ता' देऊन सुटकेचा मार्ग मिळतो, असा जनतेचा ठाम आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर गोरक्षकांनी जी भूमिका बजावली आहे, ती संपूर्ण समाजासाठी महत्त्वाची आहे. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, कायद्याच्या चौकटीत राहून हे कार्यकर्ते गो तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना माहिती देतात, कारवाया घडवतात. पण या सगळ्याचं प्रत्युत्तर समाजकंटकांकडून हल्ल्यांच्या स्वरूपात दिलं जात असेल, तर प्रशासकीय अपयश आहे.

शिरपूर तालुक्यात नुकतीच घडलेली घटना — जिथे गोरक्षकांवर थेट जमावाने हल्ला चढवला — ही अत्यंत निंदनीय, निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. गुन्हेगारांना रोखणाऱ्या नागरिकांवरच जर गुन्हेगारी हल्ले होतील आणि पोलिस-प्रशासन कठोर कारवाई करणार नसेल, त्यावर राजकीय आशीर्वादाची चादर पडणार असेल तर हे लोकशाही व्यवस्थेचे अपयशच नव्हे का? या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ म्हणून दाखल करून आरोपी अटक केले, मात्र एवढ्यावर न थांबता कठोर कारवाई करणे आणि गोहत्या रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे आहे.

देशात आणि राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे, व गो  हत्या बंदी कायदा आहे, तरी देखील हल्ले हिंदूंवरच का ? हिंदू फक्त मतदानापुरता उरला आहे का? 

प्रशासनाच्या भूमिकेवर आता कठोर प्रश्न विचारले जावेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न केवळ कागदावर सोडवता येत नाही; मैदानात उतरून गो तस्करी रोखण्यासाठी आणि गोरक्षकांच्या सुरक्षेसाठी ठोस कृती हवी. जर पोलीस आणि स्थानिक यंत्रणा याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर जनतेतून उद्रेक होणे अटळ आहे.

गोरक्षकांवर हल्ला म्हणजे फक्त एका व्यक्तीवरचा हल्ला नाही — तो संपूर्ण नैतिक मूल्यांवरचा आणि कायद्यातील विश्वासावरचाही हल्ला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, गोरक्षकांनी जर परिस्थिती हातात घेतली, तर त्याचे दायित्व प्रशासनावरच राहील.

हा प्रश्न केवळ गोहत्येचा नाही — तो समाजाच्या वैचारिक आरोग्याचा आहे. आपण कोणत्या मार्गाने चालायचे हे ठरवण्याची ही वेळ आहे. अन्यथा अशा हल्ल्यांनी आपल्याला अधिक अंधःकारात ढकलण्यास वेळ लागणार नाही. आणि शेवटी प्रश्न उपस्थित होतो की, हल्ला करणाऱ्यांची नेमकी मानसिकता काय ? त्यांना कोणाचे पाठबळ आहे ? त्यांना कायदा किंवा प्रशासनाची भीती वाटत नाही का ? त्यांना कोणाच्या राजकीय आशीर्वाद आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होते तालुक्यात होणाऱ्या  गो तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून पुढे येत आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने