"शिरपूर तालुक्याच्या यशाचा शतदिनी गौरव: तहसील, प्रांत आणि नगरपालिका कार्यालयांना राज्यस्तरीय पुरस्कार"
शिरपूर,
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत शिरपूर तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांनी उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक विभागात मानाचे स्थान पटकावले आहे.
शिरपूर तहसील कार्यालयाने तृतीय क्रमांक, शिरपूर प्रांत कार्यालयाने द्वितीय क्रमांक तर शिरपूर नगरपालिकेने तृतीय क्रमांक मिळवून प्रशासनिक गुणवत्ता आणि जनतेसाठी प्रभावी सेवा पुरविण्याबाबत आपली ठसा उमटवला आहे.
राज्य शासनाने क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी आखलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात संकेतस्थळाचे संचालन, सुकर जीवनमान, कार्यालय स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी-सुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय भेटी अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रभावी कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शिरपूर तालुक्यातील कार्यालयांनी उत्कृष्ट कार्य करून आपल्या कार्यक्षमता आणि जनसेवेचा प्रत्यय दिला आहे. हा सन्मान तालुक्याच्या प्रशासनाची गुणवत्ता अधोरेखित करणारा असून जनतेचा प्रशासनावरचा विश्वास वाढवणारा आहे.
तहसीलदार महेंद्र माळी, प्रांताधिकारी आणि नगरपालिका प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली हा यशस्वी टप्पा गाठण्यात आला आहे.