इनोव्हा कारमधून 24 लाखांचा अफूचा साठा! राजस्थानचा तस्कर मोहाडीत गजाआड



 "इनोव्हा कारमधून 24 लाखांचा अफूचा साठा! राजस्थानचा तस्कर मोहाडीत गजाआड


धुळे | मोहाडी – धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी पोलिसांनी शनिवारी पहाटे मोठी कारवाई करत 24 लाख 7 हजार रुपयांचा अफूचा साठा जप्त केला आहे. इनोव्हा कारमधून अफूची वाहतूक करणारा राजस्थानमधील एक इसम जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.


ही कारवाई 30 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास लळींग गावाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. पोलिसांनी संशयास्पद इनोव्हा (क्रमांक MH 12 DY 5920) थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने थांबण्याऐवजी वाहन घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून कार लळींग घाटात अडवली.


चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पाठलाग करत लळींग घाटात पकडले. त्याचे नाव रमेश भवराराम विष्णोई (वय 33, रा. हेमनगर, जोधपूर, राजस्थान) असे असून, त्याचा साथीदार महेश साहू (रा. खोखरिया, जोधपूर) मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.


तपासादरम्यान, कारच्या डिकीत 181.306 किलो वजनाचे अफूच्या झाडाच्या सुकलेल्या टरफल्यांचा चुरा भरलेले 10 प्लॅस्टिक गोणी सापडल्या. हा मादक पदार्थ मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारा असून, तो अवैध विक्रीसाठी वाहतूक केला जात होता. तसेच वाहनावर बनावट नंबर प्लेट लावलेली असल्याचेही निष्पन्न झाले.


या कारवाईनंतर पोलिसांनी अफूचा साठा व वाहन असा एकूण 24,07,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 17(क) आणि भादंवि कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे व उपविभागीय अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केली.


पुढील तपास पोसई अशोक पायमोडे करत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने