"महामानवाला सश्रद्ध अभिवादन; शिरपूरमध्ये १३४ व्या आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम"
शिरपूर (प्रतिनिधी):
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शिरपूर शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महामानवाच्या स्मृतिस्थळी विविध स्तरांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याला कृतज्ञतेची मानवंदना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आ. काशीराम दादा पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उद्योगपती चिंतनभाई पटेल, डायएसपी गोसावी साहेब, पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, उत्सव समिती अध्यक्ष विक्की ढिवरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बबन चौधरी व के.डी. पाटील यांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली.
सुनील बैसाणे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भूमिका मांडली, तर उपस्थितांनी सामूहिक बुद्ध वंदना सादर करत बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मूल्यांचा जागर केला.
यावेळी मा. नगरसेवक गणेशभाऊ, पिंटूभाऊ शिरसाट, बाबूदादा खैरनार, रमेश वानखेडे, प्रता्प सरदार, बापू थोरात, सुरेश अहिरे, अनिल आखाडे, प्रा. शैलेंद्र सोनवणे, भीमराव मोरे, प्रा. राजू पवार, अशोक ढिवरे, अॅड. युवराज ठोंबरे, बापू इंदासे, जेडी कुवर, डॉ. नितीन निकम, संजय जगदेव, बन्सीलाल शिरसाट, प्रता्प देवरे यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षी जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १३४ बोधिवृक्षांचे रोपण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. हे वृक्ष रोपण म्हणजे केवळ श्रद्धांजली नव्हे, तर बाबासाहेबांच्या पर्यावरणस्नेही दृष्टिकोनाचेही प्रतिक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, तर सर्व भारतीयांसाठी सामाजिक समतेचा मार्ग दाखवणारे क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी समाजव्यवस्थेत समानतेचा पाया रचला आणि आधुनिक भारताची नीती, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर उभारणी केली. त्यांचे कार्य भारतीय समाजाच्या प्रत्येक थरात आजही प्रेरणादायी आहे.
शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनांनी एकत्र येत जयंतीचे आयोजन करणे हे बाबासाहेबांनी दिलेल्या 'समता, बंधुता आणि न्याय' या तत्त्वांप्रतीची बांधिलकी दर्शवते.
