थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई: २४ किलो गांजासह एक महिला व एक पुरुष अटकेत! २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर-चोपडा रस्त्यावर सापळा रचून धडक कारवाई

 



थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई: २४ किलो गांजासह एक महिला व एक पुरुष अटकेत!


२.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर-चोपडा रस्त्यावर सापळा रचून धडक कारवाई


थाळनेर – थाळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक २५ एप्रिल रोजी शिरपूर-चोपडा रोडवरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचून गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी २४.१९० किलो गांजा, मोटारसायकलसह एकूण २,२९,३३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एक पुरुष व एक महिला आरोपीला अटक केली आहे.


थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, गुलाबी टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये असलेला इसम व पंजाबी ड्रेसमध्ये असलेली महिला काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून शिरपूरकडे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.


सदर माहितीच्या आधारे नायब तहसीलदार, वजनकाटा धारक, फोटोग्राफर व पोलिसांचा चमू घेऊन भाटपुरा चौकीसमोर सापळा रचण्यात आला. दुपारी ४.०५ वाजता संशयित व्यक्ती सापडल्यावर तपासणी केली असता, त्यांच्याकडून २४.१९० किलो गांजा (किंमत - १,६९,३३०/- रुपये) व ६०,०००/- रुपये किंमतीची मोटारसायकल असा मुद्देमाल सापडला.


अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:


इमरान लियाकत अली सैय्यद (वय ३९), रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड


समीना शेख अफसर शेख (वय ३४), रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना



या दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई दिलीप पवार हे करीत आहेत.


ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोसई दिलीप पवार, तसेच इतर कर्मचारी – उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, आकाश साळुंखे, ललिता पाटील, मुकेश पवार, रावसाहेब पाटील, भाऊसाहेब मायचे, दिलीप मोरे, होमगार्ड संजय साबळे व पोलीस मित्र मनोज कोळी यांच्या सहभागाने पार पडली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने