धुळ्यात औद्योगिक गुंतवणूक परिषद; राज्यमंत्र्यांची उपस्थिती,
धुळे, दि. 25 एप्रिल 2025 (जिमाका वृत्तसेवा):
धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी सोमवार, 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट येथे औद्योगिक गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन राज्याच्या उद्योग संचालनालय, नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक आणि धुळे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.
या परिषदेत राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, पालकमंत्री जयकुमार रावल अध्यक्षस्थान भूषवतील. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे दीपप्रज्वलन करतील.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. शोभा बच्छाव, ॲड. गोवाल पाडवी, आणि आमदार अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजीत तांबे, काशीराम पावरा, मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेचे समन्वयक म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप (भैय्या) अग्रवाल जबाबदारी सांभाळणार आहेत.
धुळे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रात नवे वळण देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी व उद्योग सहसंचालक सौ. वृषाली सोने यांनी व्यक्त करत उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
