अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात हिरालाल परदेशी यांची राष्ट्रीय कौन्सिलवर निवड
नागापट्टनम येथे महाराष्ट्रातून ४३ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
शिरपूर प्रतिनिधी :
दिनांक १५ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान तामिळनाडूतील नागापट्टनम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी घडामोड घडली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील ॲड. हिरालाल परदेशी यांची राष्ट्रीय कौन्सिलवर तर, कॉ. राजन क्षीरसागर यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या अधिवेशनाचे उद्घाटन राजस्थानचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तारासिंग सिधु यांच्या हस्ते किसान सभेच्या ध्वजारोहणाने झाले. उद्घाटन सत्रात तामिळनाडूचे कृषिमंत्री एम.आर.के. पन्नीसिलयम यांनी भाषण करत तामिळनाडूतील शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून कृषी बजेट सादर केले जाते, मोफत वीज पुरवली जाते आणि अनेक योजनांचा लाभ तात्काळ शेतकऱ्यांना दिला जातो.
केरळ राज्याचे कृषी मंत्री वाय. सुधाकर यांनी देखील केरळमधील शेतकरीहिताच्या योजनांचा आढावा उपस्थितांना दिला. महाराष्ट्रातून ॲड. हिरालाल परदेशी यांच्या नेतृत्वात ४३ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. नागापट्टनम आणि तामिळनाडू किसान सभेने अधिवेशनाची भक्कम आयोजन व्यवस्था केली होती.
या अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले, तसेच १२५ सदस्यीय राष्ट्रीय कौन्सिलची निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीवर महाराष्ट्रातील ॲड. हिरालाल परदेशी व कॉ. अशोक सोनारकर यांची निवड झाली. तसेच कौन्सिलवर ॲड. बन्सी सातपूते, डॉ. महेश कोपुलवार, गिरीश फोंडे, आत्माराम विशे, ओंकार पवार व डॉ. मोहिनी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
दिनांक १७ एप्रिल रोजी अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी नागापट्टनम बसस्थानक परिसरातून भव्य रॅली काढली. पारंपरिक तामिळ वाद्यांच्या गजरात व नृत्यात किसान सभेचे झेंडे घेऊन महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या रॅलीचा समारोप प्रचंड जाहीर सभेने करण्यात आला.
सभेत एमएसपी कायदा, पीकविमा योजनेतील फसवणूक, वनजमिनीवरील हक्काचे ७/१२ उतारे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील २० राज्यांतील एकूण ५९४ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, राज्य कौन्सिल सदस्य तुळशीराम पाटील, जिल्हाध्यक्ष सतीलाल पावरा, शिरपूर तालुका उपाध्यक्ष भरत सोनार, तालुका कार्याध्यक्ष अविनाश बुधा पावरा, नंदुरबार जिल्ह्याचे बुधा पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे आणि सचिव देविदास भोपळे उपस्थित होते.
