पत्रकारितेचं पावित्र्य जपणारा पत्रकार* ज्येष्ठ पत्रकार रणवीरसिंग राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त लेख*



 
*पत्रकारितेचं पावित्र्य जपणारा पत्रकार*

ज्येष्ठ पत्रकार रणवीरसिंग राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त लेख* 

मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क 
महासंचालनालयाचे सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अन सध्याचे स्टेट गवर्नमेंट मीडिया जर्नालिस्ट रणवीरसिंग राजपूत यांना 
वाढदिवसानिमित्त निर्भीड विचार न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा!आपणास आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,ही ईश्वर चरणी प्रार्थना!

ज्येष्ठ पत्रकार रणवीरसिंग राजपूत यांनी आज वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण केलं.याबद्दल मी राजपूत समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो! रणवीर राजपूत यांचा जन्म १ एप्रिल,१९५२ रोजी नंदुरबार येथे झाला.भाग्याची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी नेमकी *रामनवमी* होती.खऱ्या अर्थाने हा दुग्धशर्कराचा योगच म्हणावा.



 
 रणवीर राजपूत यांचे शालेय शिक्षण नंदुरबार येथील डी.आर.हायस्कूलमध्ये तर,पुढील शिक्षण जी.टी.पी. महाविद्यालयात झाले.तेथे त्यांनी बी.ए.-राज्यशास्त्र ही पदवी संपादन केली.त्यानंतर त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून एम.ए.(राज्यशास्त्र) ही पदव्युत्तर डिग्री प्राप्त केली.दरम्यान माहिती व जनसंपर्क खात्यात *उपसंपादक* म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९९८ साली(बाहेरून) *डिप्लोमा इन जर्नालिजम* *ॲन्ड पब्लिक रिलेशन्स* ही पदवी मिळवली.त्यानंतर त्यांचा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला,जो आजमितीलाही चालूच आहे.

मंत्रालयात उपसंपादक म्हणून कार्यरत असताना कठोर परिश्रम,प्रामाणिकपणा,
वक्तशीरपणा व पारदर्शकता या निकषांवर त्यांची *सहाय्यक संचालक* पदी पदोन्नती झाली.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राजपूतसाहेबांना संह्याद्री अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरिय माहिती अधिकाऱ्यांच्या परिषदेत तत्कालिन उपमुख्यमंत्री छगन भुजबळसाहेब यांच्या हस्ते *गुणवंत अधिकारी पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.वास्तवात ही त्यांच्या दृष्टीने उत्कृष्ट शासकीय सेवेची पावतीच म्हणावी.त्यावेळी पूर्वाश्रमीचे माहिती व जनसंपर्क खात्याचे महासंचालक भूषण गगरानीसाहेब(आय ए एस) हे होते.त्यानंतर सहाय्यक संचालक म्हणून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना दोन अतिरिक्त वेतनश्रेणीसह वरिष्ठ सहाय्यक संचालक(क्लास वन)पदावर पदोन्नती मिळाली.याबद्दल त्यांचे प्रसिद्धी विभागात सर्वत्र कौतुक झाले.त्या काळी पूर्वाश्रमीच्या माहिती महासंचालिका सौ.मनीषा म्हैसकरमॅडम(आय ए एस) ह्या होत्या.

दरम्यान सन २००८ मध्ये रायगड जिल्हा माहिती अधिकारी असताना महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेंतर्गत तत्कालिन एस.पी.प्रताप दिघावकर यांच्यासमवेत गावोगावी 
ग्रामसभा भरवून स्थानिक ग्रामस्थांचे तंटे,वाद,समस्या जागीच सोडविल्या.या कारणासाठी ग्रामस्थांना कोर्टकचेरी करण्याची गरज भासू दिली नाही.या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार रायगड जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तत्कालिन गृहमंत्री स्व.आर. आर.पाटील यांच्या हस्ते राजपूत यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.त्याप्रसंगी  तत्कालिन गृहमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अर्धा तास वार्तालाप करण्याची संधी त्यांना मिळाली.वास्तविक पहाता,हेच खरे राजपूत साहेबांच्या शासकीय सेवेचं फलित होय.

साऱ्या जगाला भयभीत करणाऱ्या *कोरोना* 
महामारीत ठाणे जिल्ह्यात जनजागृतीसंदर्भाचे उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल तत्कालिन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते *कोविड योद्धा सन्मान पुरस्कार* बहाल करून राजपूत यांना सन्मानित करण्यात आले.तदनंतर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या शिफारशीने कोरोना जनजागृतीबद्दल माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते *ठाणे गौरव पुरस्कार* देण्यात आला. इतकेच नव्हे तर,त्याआधी कल्याण येथे वास्तव्याला असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध योजना-उपक्रम यावर सातत्याने लेखन केल्याबद्दल माजी महापौर स्व.कल्याणी पाटील(चाळीसगावकर) अन् माजी महापौर स्व.राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते महासभेत  राजपूत यांना *उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* देऊन गौरव करण्यात आला.वास्तवात सामाजिक बांधिलकीने केलेल्या पत्रकारितेची ही त्यांना मिळालेली पोचपावतीच आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

मंत्रालयातून सेवानिवृत्त होऊन रिटायर्ड माणसाचे जीवन न जगता,आपल्याला समाजाचं देणं आहे,या भावनेतून ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत हे गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने लेखन करताहेत.आजही दिवसाकाठी किमान ५०० शब्द राज्य सरकारच्या योजना/उपक्रमांवर  लिहिणं,हा त्यांचा प्रण असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.

पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल नंदुरबारचे सुपुत्र रणवीरसिंग राजपूत यांना माजी मुख्यमंत्री अन् आत्ताचे 
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रातील *जीवन गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात आला.त्यामुळे राजपूत समाजाच्या वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला.याबद्दल राजपूत साहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन!याशिवाय
 राज्यस्तरिय साहित्य चषक पुरस्कार अंतर्गत *एकनाथ ते लोकनाथ* या विषयावरील लेखन स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना ना. एकनाथजी शिंदे अन् खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे कोरोना काळातल्या जनजागृतीबद्दल *उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* ; महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे राज्यातला पहिल्या क्रमांकाचा लेखन पुरस्कार(विषय- ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील उपाय);अंबरनाथ टाइम्सतर्फे पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते *अंबरनाथ गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे रणवीर राजपूत हे पाच वर्ष महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे 
सहसचिव होते.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे *आम्ही म्हातारे नव्हे.. महातारे* हा
लेख मुंबई सकाळ व नवशक्ती प्रसिद्ध झाला अन् राज्यातील सकल ज्येष्ठ नागरिकांनी त्याला पसंती दर्शवून दूरध्वनीद्वारे राजपूत यांचे अभिनंदनपर कौतुक केलं.याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,फुले दाम्पत्य,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे, बिरसा मुंडा,बाल क्रांतीकारक शिरीषकुमार मेहता,पंतप्रधान नरेंद्र मोदी,माजी मुख्यमंत्री अन् आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वा वरील लेख राज्यातील लोकप्रिय वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.

तसेच कोरोना काळातील माझे कुटुंब माझी जबाबदारी अन् मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण हे लेख राज्यभर खूप गाजलेत.*सामाजिक समता* या विषयावरील लेखनाबद्दल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे त्यांना *डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य लेखन पुरस्कार* देण्यात आला.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वरील सर्व पुरस्कार त्यांना रिटायर्ड झाल्यावर मिळाले.सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं लेखन करणं,हा त्यांचा छंद असावा,असे दृष्टोत्पत्तीस येते.

ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांनी आपल्या मुलाखतीत पत्रकारांना उद्देशून म्हटले आहे की, "पत्रकारांनी पेड न्यूज,पितपत्रकारिता,दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे लिखाण एवं एखाद्या व्यक्ती वा संस्थेबद्दल बदनामीकारक लेखन अशा असभ्य,अश्लाध्य व असामाजिक कारवायांना आपल्या पत्रकारितेत अजिबात थारा देऊ नये.तसेच *ब्रेकिंग न्यूज* देतेवेळी वस्तूनिष्ठता व सत्यावर आधारित बातम्या द्याव्यात.कोणाचेही 
चारित्र्यहनन होणार नाही,याची खबरदारी घेऊन पत्रकारिता क्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारांनी आपले भरीव योगदान द्यावे,जेणेकरून *लोकशाहीचा चौथा स्तंभ* म्हणून पत्रकारिता क्षेत्राचे नाव समाजात सदैव आदराने-सन्मानाने घेतले जाईल".याप्रसंगी दर्पणकार वंदनीय बाळशास्त्री जांभेकर,थोर संपादक लोकमान्य टिळक,थोर संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महान संपादकांना त्रिवार मानाचा मुजरा!

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने