जामन्यापाडा येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करा; ग्रा.पं. सदस्य विलास पावरा यांची मागणी
शिरपूर: तालुक्यातील जामन्यापाडा हे गाव महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर वसलेले आहे. गावातील लोकसंख्या 2000 च्या वरती आहे. तसेच गावात शासकीय आश्रमशाळा व जि. प. मराठी शाळा आहे. जामन्यापाडा गावापासून आरोग्य केंद्र 7 किमी अंतरावर असून ये-जा करण्यासाठी पुरेसे साधन उपलब्ध नाहीत. प्रसंगी वेळेवर उपचार मिळत नसल्याने लोकांना जीव गमवावा लागतो. आरोग्य केंद्र जास्त अंतरावर असल्याने गरोदर माता, वृद्ध माणसे आणि लहान बालके यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामन्यापाडा गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर करून मिळावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास पावरा यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
