अनाथ आश्रमात शिकणारा धनराज राजपूत ला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार*



 *अनाथ आश्रमात शिकणारा धनराज राजपूत ला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार*


शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील थाळनेर येथील धनराज राजपूत हे सात वर्षाचे असतांना वडीलांचे क्षत्र हरपले. त्यावेळेस आपली आई व तीन बहिणींना दोन वेळचे जेवणही नशिबी नव्हते. धनराज राजपूत यांना इयत्ता दुसरीत धुळे येथील दीनबंधु अनाथ आश्रमात दाखल केले गेले. या आश्रमात राहून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईने दिवस-रात्र एक करून शिवणकाम व बहिणींनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला व धनराज राजपूत यांना प्रोत्साहन देत गेले. 



अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतांना पुढे स्वतःचा व कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही बाब त्यांनी मनात बिंबवली व चौथीपासून थेट पदवीत्तरपर्यंतचे शिक्षण घेत असतांना अंशकालीक नोकरी करून एमएससी, एबीए, एमफिलचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी कुठल्याही कामाची लाज न बाळगता शिक्षणासाठी लहानपणापासून दूध वाटणे, खासगी वाहनांवर पॅसेंजर भरणे, वृतपत्र वाटणे, टेलिफोन बुथवर काम करणे असे सर्व व्यवसाय केले.



शिक्षणानंतर एका खाजगी कंपनीत त्यांनी आपली नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ४ वर्षानंतर नोकरी करायची नाही तर नोकरी द्यावी हा निर्धार घेऊन सन २००७ मध्ये व्यापारासाठी मुंबई गाठले व अनेक अडचणींना सामोरे जावून स्वतःची  बालाजी सेफ्टी प्रोजेक्टस् या नावाने व्यापाराची सुरुवात केली. 


आज त्यांचा व्यापार संपूर्ण भारतात बांधकाम, औद्योगिक व शासकीय क्षेत्रात सुरक्षा वस्तुंचे व्यापार उच्चस्तरीय ठरू लागला आहे. त्यांच्या या अद्वितीय कामगिरी व उद्योगातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2025' या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

 

नाशिक येथे महाराष्ट्र शासन मान्य रिसील व समाचारवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या शुभहस्ते धनराज राजपूत यांना उद्योगरत्न पुरस्कार  देण्यात आला.

 

पुरस्कार सोहळ्यास एमएसएमईचे सहायक संचालक अभय दप्तरदार, आयएमएफचे मुख्य महाव्यवस्थापक संजय हजारी, सतीश कल्याणकर, युको बँकेचे झोनल मॅनेजर अमलेश त्रिपाठी, महाराष्ट्राचे जीएसटीचे सहायक कमिशनर डॉ चेतनसिंग राजपूत आदी उपस्थित होते.


ध्येयाने पछाडलेला व्यक्ती काय करू शकतो याचा प्रत्यय एका अनाथ आक्षमात शिकलेल्या धनराज राजपूत यांच्या कडे पाहून येतो. हा पुरस्कार एकट्या धनराज राजपूत यांचा नसून तो संपूर्ण तालुक्यातील राजपूत समाजाचा गौरव आहे असे गौरवोउदगार येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेच्या वतीने करण्यात आला. शिरपूर राजपूत समाज संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया व संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडून धनराज राजपूत यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने