महायुतीचे संकट मोचक संकटात ? निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ ?
मुंबई वृत्तसंस्था -
वि धानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे संकटमोचक समजले जाणारे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अडचणीत सापडले आहेत. महिला पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यासोबत नवटके यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांचंही नाव घेतलं आहे. या प्रकरणामुळे महाजन संकटात सापडल्याचं बोललं जात आहे.
जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र नवटके यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, महाजने हे लाभार्थी असल्याचं उघड झाल्याचा दावा केला आहे, तर रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित व्यक्तीवर कारवाई केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं नवटकेंनी याचिकेमध्ये म्हटले आहे.
मात्र या सर्व आरोपांना मंत्री आणि महायुतीचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी फेटाळले आहेत.मला अडकवण्यासाठी करण्यात आलेलं षडयंत्र आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना अडचणीत आणू शकतात विरोधक या मुद्द्यावर आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या राजकीय अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
