लोकसभेत पराभव, विधानसभेत बदला, डॉ हिना गावित विधानसभेच्या मैदानात रोख ठोक -महेंद्रसिंग राजपूत




लोकसभेत पराभव, विधानसभेत बदला, 
डॉ हिना गावित विधानसभेच्या मैदानात

रोख ठोक  -महेंद्रसिंग राजपूत 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सतत दोन वेळा खासदार असलेल्या डॉक्टर हिना गावित यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजपच्या तरुण महिला खासदार, संसदेमध्ये तत्परतेने विषय मांडण्यात अग्रेसर, आणि अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त , मोठा राजकीय वारसा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वाद, भारतीय जनता पार्टीची भक्कम साथ, अशा सर्व जमेच्या बाजू असताना देखील मोठ्या मताधिक्याने लोकसभा निवडणुकीत डॉक्टर गावी यांच्या पराभव झाला. 
विशेष म्हणजे त्यांच्या हा पराभव कोणी मातब्बर उमेदवारांनी केलं नाही तर अगदी पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या नवख्या उमेदवाराने केला. त्यामुळे हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 

आता याच पराभवाच्या बदला घेण्यासाठी पिता-पुत्रांना राजकीय धक्का देण्यासाठी डॉक्टर हिना गावित विधानसभेच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत.

गेल्या महिन्याभरापासून त्या अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात तळ ठोकून आहेत. या परिसरात त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यातच त्यांचे वडील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी याच मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनाचा लावलेला धडाका यामुळे या मतदारसंघात महायुतीकडील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित या विधानसभेच्या रणांगणात उतरून विद्यमान आमदारांना आव्हान देणार का ? अशी चर्चा सुरू आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजप वरील अंतर्गत नाराजी, तालुका व जिल्ह्यातील नेत्यांची असलेली नाराजी, जवळच्या लोकांनी विरोधात घेतलेली भूमिका अशा अनेक गोष्टी या कारणीभूत होत्या.

लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी मदत केली होती. मुन्ना दादा रावल यांनी देखील उघडपणे गावित परिवाराच्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार केला होता.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे डॉ. हिना गावित यांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी हे सलग ३५ वर्षांपासून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार आहेत. त्यांच्याच मुलाने डॉ.हिना गावित यांचा पराभव केला. त्यामुळे पाडवी पिता-पुत्रांना
त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ. हिना गावित यांनी कंबर कसली असल्याचे म्हटले जाते. डॉ. गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.


या सर्व राजकीय घडामोडींची परतफेड करण्यासाठी मागील काही दिवसांपासून डॉक्टर हिना गावित या भागात सक्रिय झाल्या असून
अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.


लोकसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता विरोधकांनी डॉ. हिना गावित यांच्याविरोधात मोट बांधल्याने पाडवी यांना एक लाख २५ हजार मते या मतदारसंघातून मिळाली होती. दुसरीकडे, गावित यांना सुमारे ८५ हजार मते मिळाली होती. आता गावित यांच्याविरुद्ध एकत्र येणारे सर्व विरोधक वेगवेगळे लढणार असल्याने त्यांच्या मताची विभागणी होऊन गावित यांना फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे. डॉ. हिना गावित यांनी मतदारसंघातील अक्कलकुवा शहरात एक तर, धडगाव शहरात एक घर वास्तव्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे मानले जात आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या वचपा काढण्यासाठी आता डॉक्टर हिना गावी या विधानसभेच्या रणांगणात उतरून विरोधकांना आव्हान उभे  करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर नंदुरबार जिल्ह्यासह राज्याची लक्ष लागून  असेल.

आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे करून डॉक्टर गावित विजय प्राप्त करतील का याकडे देखील नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने