महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे - जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर
धुळे, दि. 25 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा. भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. निवडणुकीच्या वेळी उमेदवार/राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करतात. मात्र, असा प्रचार करताना उमेदवारांनी या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना या अर्जात त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेला जाहिरातींवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशेबात दाखविणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश इ. बाबत आदर्श आचारसंहिता तरतुदी लागू आहेत. इलेक्ट्रॅानिक मीडियावर करावयाच्या प्रचार जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) द्वारा तपासूनच, अशा जाहिराती प्रसारीत करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची प्रिंट मीडिया, सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर राहणार आहे.
जिल्हास्तरावर मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला असून पोलिस सायबर विभागाचे तज्ञ अधिकारी या सेलमध्ये कार्यरत राहतील. या सेलचे सोशल मीडियाद्वारे करण्यात येणा-या राजकीय जाहिरातींवर लक्ष असेल. सोशल मीडियाद्वारे मानहानीकारक संदेश पाठवणे, धार्मिक भावनांना धक्का पोहोचणारे, भावना भडकावणारे, समाजातील शांतता, एकोपा यांना तडा देणारे विघातक संदेश पाठविण्यावर या सेलचे विशेष लक्ष आहे. राजकीय पक्ष/ उमेदवारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की, इंटरनेट माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रचारावर देखील आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. मतदारांना जात/धर्मावर आधारित मतदान करण्याबाबत आवाहन करता येणार नाही. धार्मिक स्थळ, पूजा स्थळांचा वापर निवड़णूक प्रचारासाठी करता येणार नाही. तसेच सोशल मीडियावरून करण्यात येणा-या जाहिरातींद्वारे वाईट भाषा आणि मानहानीकारक भाषा वापरून निवड़णूक प्रचार करता येणार नाही.
जिल्ह्यातील मतदारांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या विघातक जाहिराती, जनतेत तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तीच्या संदेशाकडे लक्ष न देता सद्सद विवेकबुध्दीने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे.
00000
