तुम्ही दुसऱ्या पक्षाचे इथे कसे? भाजप आमदाराने स्वागत करताच शरद पवार यांचा सवाल, व्हिडिओ राज्यभरात व्हायरल
शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा निमित्त माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पवार यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तालुक्यात शेतकरी मेळावा पार पडला.
या शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार यांचे जेव्हा शिरपूर विमानतळावर आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या आमदार आणि नेत्यांचाही समावेश होता.
पण, सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते भाजपचे आमदार अमरीश भाई पटेल यांनी.
पवार यांच्या आगमनानंतर अमरीश भाई पटेल यांनी जेव्हा शरद पवार यांना पुष्पगुच्छ दिला तेव्हा, शरद पवार यांनी मिश्किलपणे पटेल यांना विचारले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथे कसे? पवारांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या घटनेचा व्हिडिओ मात्र काल दिवसभर राज्यभरात व्हायरल झाला होता. त्यात फडणवीसांच्या आमदार शरद पवारांच्या स्वागताला असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या वृत्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
शिरपूर विमानतळावर नेमकं काय घडलं?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पवार यांचे शिरपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी पवार यांचे स्वागत केले.
यावेळी पवार यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचे आमदार अमरीश पटेल हे सुद्धा उपस्थित होते.
एक ज्येष्ठ नेते आपल्या तालुक्यात येत आहेत, पूर्वीपासून त्यांच्याशी पारिवारिक संबंध आहेत, आपल्या तालुक्यात त्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे असे मानून पटेल हे हे त्यांच्या स्वागतासाठी गेले होते.
जेव्हा पवार यांनी पटेलांना पाहिले तेव्हा ते हसत हसत म्हणाले, "तुम्ही दुसऱ्या पक्षाचे इथे कसे?" पवार यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तेवढ्यात आमदार अमरीश पटेल म्हणाले, "पक्ष बिक्ष काही नसते हो साहेब." यानंतर पवार यांनीही हसत हसत पटेल यांची आणि परिसराची चौकशी केली. आणि हितगुज केले.
मात्र हा सर्व संवाद कॅमेऱ्यात कैद झाला, आणि भाजपच्या आमदारांनी राष्ट्रवादीचा नेत्यांचे स्वागत केले, आणि त्यावर पवारांनी केलेली मुश्किल टिपणी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होता.
