महामार्ग रस्त्याच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त वसुली करूनही टोल लूट सुरूच महामार्ग असूनही रस्त्याची प्रचंड दुरावस्था आता या विरोधात यलगार पुकारावाच लागेल शिरपूर फर्स्ट मुंबई- आग्रा महामार्गावर करणार उपोषण




महामार्ग रस्त्याच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त वसुली करूनही टोल लूट सुरूच 
महामार्ग असूनही रस्त्याची प्रचंड दुरावस्था 
 आता या विरोधात यलगार पुकारावाच लागेल शिरपूर फर्स्ट मुंबई- आग्रा महामार्गावर करणार उपोषण


शिरपूर व सोनगीर टोलच्या माध्यमातून मुंबई - आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई-आग्रा महामार्ग वर टोल आकारून नागरिकांकडून लूट केली जात आहे. या टोल लुटीच्या विरोधात आता शिरपूर फर्स्ट ने मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
     शिरपूर व सोनगीर टोल नाक्याच्या लुटीविरोधात शिरपूर फर्स्ट गेल्या दोन महिन्यापासून विविध माध्यमातून आंदोलन करीत आहे. मात्र आता शांततेच्या आंदोलनातून टोल प्रशासनाला जाग येत नाही.यामुळे आता मुंबई- आग्रा महामार्गावर नागरिकांसह उपोषणाला बसणार असल्याचे शिरपूर फर्स्ट चे संयोजक हंसराज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.

    शिरपूर सोनगीर टोलची हद्द ८८ किलोमीटर आहे, यासाठी ८३५ कोटी रूपये खर्च झाला आहे व आजपर्यंत वसुली २ हजार कोटी झाली आहे.असे माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मिळाली आहे.
      राष्ट्रीय महामार्ग ३ मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमा ते धुळे अश्या ८८ किलोमीटरसाठी २ टोल आकारले जातात. ८८ किलोमीटरसाठी ८३५ कोटी रूपये एवढी रक्कम  खर्च लागला होता. अशी माहिती माहितीच्या अधिकाराद्वारे मिळाली आहे.
   आणि यात टोल च्या माध्यमातून आतापर्यंत शिरपूर टोलची ९१३ कोटी व सोनगीर टोलची १ हजार ५ कोटी अशी एकूण २ हजार कोटीच्या घरात वसुली झाली आहे. महामार्गावर शिरपूर ते धुळे ५० किलोमीटरसाठी २ टोलचे २१० रुपये मोजावे लागतात. शिरपूर टोल हा शिरपूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे व शिरपूर टोल ते सोनगीर टोल यामधील अंतर केवळ ३२ किलोमीटर आहे. 
          शिरपूर व  सोनगीर टोल इंटरराईस ह्या कंपनीने चालवायला घेतला आहे. इंटरराईस ही शेयर मार्केट मधील एक मोठी कंपनी आहे. पण टोल प्रशासन आणि न्हाई वाहनधारकांकडून प्रति किलोमीटर ३.५ रुपये टोल आकारूनही महामार्गावर काम करत नाहीत, निकृष्ट दर्जाचे रस्ते, टोल द्वारे मिळणाऱ्या सुविधा, उड्डाणपूल वरील बंद असलेले दिवे अशी गैरसोय यावर आहे.
      उड्डाणपूलमुळे टोल आकारला जातो असे वारंवार टोल प्रशासनांकडून सांगण्यात येते पण आज त्या उड्डाणपूलची अवस्था एक गाव-खेड्याच्या रस्त्यासारखी झाली आहे. पावसाळा सुरू आहे महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. मागील काही काळापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पण तरी यावर टोल प्रशासन व न्हाई काम करत नाही फक्त टोल वसुलीसाठी काटेकोर नियम येथे पाळले जातात.
     महामार्गावर तापी नदीवर असलेल्या उड्डाणपूलला कुठलेही संरक्षण नाही. रोज होणाऱ्या आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी इथे संरक्षण जाळी असणे गरजेचे आहे. यावर ही टोल प्रशासन न्हाई उत्तर देत नाही. वाहनधारकांनी टोल भरतेवेळी प्रश्न विचारल्यास हुज्जत घातली जाते. टोल प्रशासनाच्या तांत्रिक अडचणी मुळे देखील येथील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो व वाहतूक कोंडी सातत्याने होत असते.
    शिरपूर फर्स्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, न्हाई ते स्थानिक प्रशासन सर्वांना अनेक वेळा निवेदन केले आहे. पण यावर संपूर्ण प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आता शिरपूर फर्स्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून महामार्गावर असणारे खड्डे व असणारी दुरावस्था समोर आणत आहे. मात्र तरीही टोल प्रशासनाला याचे काही देणे घेणे नाही.
     यामुळे आता शांततेच्या मार्गांचे आंदोलन खूप झाले यापुढे २० सप्टेंबर पर्यंत यावर तोडगा न काढल्यास तालुक्यातील हजारो  नागरिक वाहनांसह महामार्गावर उपोषणाला बसतील असा इशारा शिरपूर फर्स्ट चे समन्वयक हंसराज चौधरी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने