तिर्थस्वरुप नानासाहेब, औक्षवंत व्हा....
लेख - दिवाण तात्या सूर्यवंशी
धुळे जिल्हा परिषदेत आपण एकत्रितपणे ३० ते ३५ वर्षे सेवेत असताना मैत्री, सलोखा, स्नेह, आपुलकीचे संबंध जोपासले. सेवानिवृत्त होऊन उभयतांना १५/२० वर्षे झाले असूनदेखील आपल्यातील संबंध अधिकाधिक वृद्धिगत झाले कारण आपल्या स्वभावात असलेला गोडवा, माधुर्य, शालीनता, प्रामाणिकपणा, विनयशीलता आणि शांत व संयमीपणा. अशा विविध पैलूमुळे आपली सोबत मला सतत हवीहवीशी वाटते. सुसंवादातून नातं दृढ करायची कला आपल्यात असून आपल्या प्रभावामुळे जवळ आलेल्याना योग्य मार्गदर्शन करण्याची कला आपल्यात उपजत आहे. यामुळेच आपलं व्यक्तीमत्व अधिक खुलून दिसतं. आपल्या व्यक्तीमत्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर आपोआप पडते. आपला स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा आहे, त्याला कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही म्हणूनच लोकं आपल्याशी आपोआप कनेक्ट होत जातात. निरागस समाधान सदैव आपल्या चेह-यावर वैभव म्हणून पाहायला मिळतं अन् तीच आपल्या अंतःकरणाची खरी संपत्ती होय, आणि ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी असतो. आयुष्यात आरशा सारखा आणि सावली सारखा मित्र असावा लागतो. कारण आरसा वस्तुस्थिती दर्शवितो तर सावली कुठल्याही परिस्थितीत आपली साथ सोडत नाही. या व्याखेत तुम्ही अचूक व चपखल बसतात. याच नजरेने मी आपल्याकडे बघत आलो आहे. चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो पण योग्य संगतीने अधिक बहरतो. आपल्या योग्य संगतीत माझ्यासह अनेकांचे आयुष्य असेच बहरलेले, फुललेले आहे याची मला परिपूर्ण जाणीव आहे. सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं, (जिभेवर खडीसाखर डोक्यावर बर्फ ) या स्वभावामुळे आपलं व्यक्तीमत्व सदाबहार आणि टवटवीत आहे.
नानासाहेब ! जिल्हा परिषद सेवा म्हणजे तारेवरची कसरत होय. तथापि अधिकारी आणि पदाधिकारी याच्यात समतोल राखत आपण नियमानुसारच प्रशासकीय कार्यपध्दती अवलंबली. अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील दुआ बनून सदैव कर्मचाऱ्यांचीच बाजू घेतली म्हणून तमाम जि.प. कर्मचाऱ्यांच्या ह्रदयात आपण स्थान निर्माण केले. म्हणूनच कर्मचाऱ्यांनीदेखील आपणास जि.प.कर्मचारी संघटना तसेच जि.प. कर्मचारी पतपेढीवर सेवाकाळात जास्तीत जास्त काळ नेतृत्व करण्याची संधी दिली. ती जबाबदारी देखील आपण यशस्वीपणे सांभाळली याचा सार्थ अभिमान आहे.
नानासाहेब ! आपल्यातील हाच नेतृत्व गुण हेरुन आदरणीय अमरिष भाईंनी सेवानिवृत्तीनंतर आपल्यावर शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. राजकारणातील आपलं पदार्पण आमच्यासाठी भूषणावह आहे. मिळालेल्या संधीच आपण सोनं केलं आणि बाजार समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून दाखवली. या कौतुकास्पद कामगिरीमुळेच भाईसाहेबांनी आपल्या खांद्यावर पुनश्च ही जबाबदारी सोपवली हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.
नानासाहेब ! श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता तीच आपली खरी "श्रीमंती" होय. जोडीला चांगला मृदू स्वभाव ही तर आपण कमावलेली स्वतःची आणि स्वकष्टार्जित सर्वात मोठी "कमाई" आहे. तसेच अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आपण मिळविलेली "मिळकत" आहे. आणि चांगले व समजूतदार मित्र ही आपली "संपत्ती" होय.
नानासाहेब ! शैक्षणिक क्षेत्रात देखील आपण उज्वल व भरीव कामगीरी केली असून मयुर व महाराणाप्रताप विद्यालयाची उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. शासकिय सेवा, शैक्षणिक संस्था आणि राजकारण याबरोबरच एक कुटूंबप्रमुख या नात्याने आपण आपल्या सर्व भावांसोबतच आप्तस्वकीयांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे सुखी संसार उभारले. चिरंजीव भैय्याने तर आपल्यातील नम्रता व विनय हे गुण घेऊन यशस्वी उद्योजक होऊन अनेक व्यवसाय वृद्धिगत केले, वाढवले व नावारुपास आणून आपलं नांव मोठं केलं. धुळे जिल्ह्यातील भैयाचा मित्रपरिवार व लोकसंग्रह खूप मोठा आहे. म्हणून स्वकर्तुत्वावर मजूर फेडरेशनवर निवडून आला. चिरंजीव किरणने देखील बांधकाम व्यवसायत उत्तम प्रगती केली आहे. सुशिक्षित व संस्कारी सूना, उच्चशिक्षित व उच्चपदस्थ जावई आणि नातजावई तसेच निरागस व हट्टी नातवंडानी आपलं कुटुंब परिपूर्ण झाले आहे. ज्या घरात लेकी, सूना, सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो. आपल्या कुटुंबातील मधूर, रसाळ गप्पा ऐकून खूप प्रसन्न वाटते. आपला पारंपरिक व वडीलोपार्जीत शेती व्यवसाया बाबत फार काही बोलत नाही. कारण आपण आजपर्यंतच्या आयुष्यात तोट्याची शेती करुन, आनंदाची बाग फुलवत, नफ्याची फुलं वेचून इतरांना वाटली.
भावा ! कित्येक वर्षांपासून डायबेटीस नावाच भूत आपल्या मानगुटीवर आरुढ आहे. पण नियमितपणे व्यायाम आणि योग्य, सकस व नियंत्रित आहारामुळे आपण स्वतः मांत्रिक होऊन त्या भूताला नियंत्रणात ठेवलं आहे. परदेश वारीत आपण अनेकदा सोबत असताना आपला उत्साह तरुणांना देखील लाजवणारा असतो हे आवर्जून नमूद करीत आहे. अखंड सौभाग्यवती तिर्थस्वरुप वहिनी साहेबांचा आपल्या यशात मोठा वाटा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्री असतेच. आपल्या यशात सौ. वहिनींची आश्वासक उपस्थिती आणि त्यांचे प्रोत्साहन कधीही नाकारता येणार नाही. सौ. वहिनी स्वतःसाठी कधी जगल्याच नाहीत त्यांनी आपलं सपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी आणि कुटूंबासाठीच समर्पित केले आहे. म्हणून आज तुमच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनाही मानाचा मूजरा करण्याचा अल्पसा प्रयत्न.
नानासाहेब ! आपल्या विचारात उच्चता व वागण्यात सत्यता असून होकारात्मक विचार, सकारात्मकदृष्टी, सक्रिय सहभाग, झुंझारवृत्ती ही सारी उमद्या मनाची लक्षणं आपल्या व्यक्तीमत्वात आहेत. आपलं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व अखंड, अविरत सुरू राहो. यासाठी माझ्या सर्वगुणसंपन्न, दिलदार व जिगरबाज दोस्तास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा चरणी दिवाण तात्या सूर्यवंशी परिवार तसेच धुळे जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे नम्र प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभम् भवतुः !!
Tags
news
