**रोटरी स्कूलमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न**
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय -श्री हिमांशु शाह
दोडाईचा (मुस्तूफा शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या विचारविनिमयासाठी आयोजित करण्यात आलेली पालक-शिक्षक सभा संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, संचालक श्री पी. सी. शिंदे, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेस पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा योगिता कागणे,सदस्य प्रविणसिंग गिरासे, भूषण पाटील, गिरीष मानकर, रिया केसवाणी, माधुरी गुरव, कविता मराठे, प्रतिभा पवार, भारती बच्छाव, चित्रलेखा गिरासे, धनश्री अडगाळे व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
यावेळी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी शैक्षणिक आराखड्याचे पीपीटी द्वारे सादरीकरण करून स्पष्टीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यासक्रमाचे नियोजन, परीक्षा व मूल्यमापन, उपचारात्मक तासिका, विदयार्थ्यांची सुरक्षितता, वाहतूक संस्कार,भौतिक व शालेय सुविधा, विविध स्पर्धा, सहशालेय उपक्रम, शिक्षक-पालक परस्पर संबंध, दप्तराचे ओझे अशा विविध शालेय व सहशालेय विषयांवर चर्चा करण्यात आली.
पालकांनीही रोटरी स्कूलच्या ज्ञानगंगेत डुबकी मारणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह म्हणाले की, 10 वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी स्वतःची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन यामुळे चमकदार कामगिरी करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शाळा यशस्वी वाटचाल करीत आहे. भविष्यात येणाऱ्या बदलांचा आढावा घेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार अत्याधुनिक शालेय सुविधांची पूर्तता करून देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याची प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षकांशी वेळोवेळी संपर्क करावा. असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ललिता गिरासे यांनी केले.
