फॅक्टरी कामगारांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्या शहादा पोलिसांकडून अटक
*सुमित गिरासे,शहादा* शहादा येथील जुना प्रकाशा रस्त्यावरील शिरूड
चौफुली जवळ सूर्या फॅक्टरीमधील कामगारांनी रोख रक्कम चोरून नेत असताना सोमवारी पहाटे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या बीट मार्शल यांनी रंगेहाथ पकडून संशयित आरोपींना अटक केली असता त्यांच्या ताब्यातून एका दुचाकी व एक लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिस सूत्रांनुसार, २९ जुलैच्या पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास शहादा पोलिस ठाण्यातील बीट मार्शल मिथुन शिसोदे व अमृत पाटील हे शहादा शहारात रात्री गस्तीकामी शासकीय दुचाकीवरून गस्त घालत होते. शहरातील गाडगेबाबा आश्रम परिसरात पोहोचले असता त्यांना एका दुचाकीवरून तीनजण पांढऱ्या रंगाच्या गोण्या संशयास्पद घेऊन जात असताना दिसले. त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव तेथून पसार झाले. त्यांचा पाठलाग करून त्यांना गुजर भवनच्या पाठीमागे शहादा येथे शिताफीने पकडले.
बीट मार्शल यांनी तातडीने पोलिस जमादार प्रदीप राजपुत, विकास शिरसाठ यांना कळवून तेथे त्यांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने पकडलेल्या तिघांना शहादा पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी व झडती घेतली. त्यांच्याकडील पांढऱ्या गोण्यांमध्ये एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या चिल्लर नाणी व नोटा आढळून आल्या. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी त्या गोण्या या सूर्या फॅक्टरी, शिरुड चौफुली येथील कार्यालयातून चोरल्याचे सांगितले. त्यानंतर सूर्या फॅक्टरीचे मालक मुकेश बल्लंवन तेवर, रा. मनरद, ता. शहादा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फॅक्टरीच्या कार्यालयात जाऊन चोरीबाबत खात्री केली.
कार्यालयाचा दरवाजा तोडून तेथे ठेवलेले पैशांची चिल्लर व रोख रक्कम असे एकूण दोन लाख १५ हजार रुपये चोरीस गेल्याचे सांगितले. तसेच अटक केलेली मुले हे त्यांच्या कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगितले.
याबाबत सूर्या फॅक्टरीचे मालक मुकेश तेवर यांच्या फिर्यादीवरून दिनेश तारसिंग ठाकरे (रा. सालदारनगर, शहादा), गणेश हारसिंग गिरासे, (रा.लांबोळा, ता. शहादा), भूषण मराठे (रा.रामनगर, शहादा) या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस.,अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित अहिरे, जमादार प्रदीपसिंग राजपुत, हवालदार विकास शिरसाठ, मिथुन शिसोदे, अमृत पाटील यांनी केली.
