माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने,
शिरपूर साखर कारखाना अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर ताब्यात
शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. लि. शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे हा अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर देण्यात आला असून लवकरच कारखाना सुरु करणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
सर्व प्रक्रिया पूर्ण करून अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर दि. 10 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता सदरचा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजेच सन 2024-25 च्या ऊस गळीत हंगामासाठी 20 वर्ष कालावधी साठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मध्यप्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला.
सुरुवातीला जनक विला आमदार निवासस्थानी बैठक घेण्यात येऊन कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, जिल्हा बँक अध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माँ-रेवा कंपनीचे मालक अजय गोयल, अंकित गोयल, विशाल अग्रवाल, ऋषभ अग्रवाल, साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा बँक सीईओ धीरज चौधरी, बँक जनरल मॅनेजर अनिल सिसोदे, कारखाना संचालक के.डी.पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश चौधरी, डी.पी.माळी, राहुल रंधे, वासुदेव देवरे, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, नारायणसिंग चौधरी, जयवंत पाडवी, सौ. मंगला परेश दोरिक, सौ. सुचिता विजय पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष साखर कारखाना साइटवर जाऊन कारखाना संबंधित ग्रुपला ताब्यात देण्यात आला. यावेळी माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांच्या वतीने कारखाना लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बँक अध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, कारखाना संचालक मंडळ यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी संचालक मंडळामध्ये चर्चा होऊन दि. 10/09/2022 रोजी सर्व कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती व त्या नुसार सर्व सदस्यांनी बहुमताने भाडेतत्वावर कारखाना देण्यासाठी संमती दिली होती. तद्नंतर निविदा तयार करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे व प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले. ई-ऑक्शन (ई-निवीदा) द्वारे ऑनलाईन निवीदा प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाईन ई-ऑक्शन (ई-निविदा) प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मध्यप्रदेश यांची निविदा सर्वोच्च दराची असल्याने त्यांना 20 वर्षासाठी सदरचा कारखाना भाडेतत्वाने देण्यात आला.
या संदर्भात शिरपूर साखर कारखाना व धुळे जिल्हा बँक यांच्या संयुक्त समितीने सदरची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली असून, साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक संचालक मंडळ यांनी याबाबतचा ठराव मंजूर केला होता. दि. 10/09/2022 पासून सर्व निविदा कायदेशीर प्रक्रिया, मा. न्यायालयीन बाबींची पूर्तता, साखर कारखाना व जिल्हा बँक यांचे देणी रकमेबाबतचा सर्व वरीष्ठ कार्यालय स्तरावरचा पत्रव्यवहार व साखर कारखाना यांची देणे रकमेबाबतचे इतर मा. न्यायालयातील न्यायप्रविष्ट बाबी, शासकीय देणे बाबत कागदपत्रांची तपासणी व कारखाना 20 वर्षासाठी भाडेतत्वाने देण्यासाठीचा भाडे करारनामा यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया, तज्ञ वकिलांचे मार्गदर्शन व पूर्ततेसाठी मधल्या काळात कामकाज झाले होते.
सदर उद्योजक अजय गोयल, अंकित गोयल यांनी हा 8 वा साखर कारखाना चालवायला घेतला असून यापूर्वी 7 साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालविले आहेत. यापूर्वीच्या कारखान्यातून इथेनॉल निर्मिती व विज निर्मितीवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भर देऊन भरपूर इथेनॉल व विज निर्मिती केली आहे.
गेल्या काही वर्षापासुन शिरपूर तालुक्यातील ऊस याच अनुभवी उद्योजक कडे दुर्गा खांडसरी व ठिकरी मध्यप्रदेश येथील साखर कारखान्यांमध्ये शेतकरी बांधव नेत होते. त्यामुळे संबंधित उद्योजक हे शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे सुपरिचित असून त्यांचा आर्थिक व्यवहार चांगला असल्याचा अनुभव शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
त्यामुळे अतिशय योग्य व चांगल्या ग्रुपला शिरपूर साखर कारखाना अक्षय तृतियेच्या शुभमुहुर्तावर हस्तांतरित होत असल्याची बाब समाधानकारक व आनंददायी असल्याच्या प्रतिक्रिया शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी दिल्या आहेत.
