विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान




विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान

मुंबई । मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या ४ मतदारसंघांच्या निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.


विलास पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) या विधानपरिषद सदस्यांची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत असल्याने या ४ मतदारसंघाकरिता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ४ मतदार संघासाठी यापूर्वी १० मे रोजी निवडणूक होणार होती मात्र राज्यातील शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आल्याने तसेच मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदार हे बाहेर गावी गेल्याने या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटनांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली
होती. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता या निवडणुका येत्या २६ जून रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या ३१ मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर ७ जून पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी १० जून रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून अशी आहे. २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. तर १ जुलै रोजी मतमोजणी होईल.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने