आपल्या खासदाराची निवड कर्तुत्वावर की देशाच्या नेतृत्वावर
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गावित आणि पाडवी यांच्यातील लढाईत काँग्रेस पुन्हा इतिहास रचणार का?
राजकारण - महेंद्रसिंह राजपूत
सध्या देशात निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असून लोकसभेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात नंदुरबार जिल्हा मतदार संघात सध्या तरी भारतीय जनता पार्टीची तिसऱ्यांदा उमेदवारी डॉक्टर हिना गावित यांना प्राप्त झाली असून असून त्यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे करण्यासाठी एडवोकेट गोवाल पाडवी यांना काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आली आहे. यात सुशीलकुमार पावरा सारख्या कडवी झुंज देणाऱ्या व लोकमान्यता प्राप्त असलेल्या अपक्ष उमेदवाराची देखील भर आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रतिनिधी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
मात्र आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून विचार केला तर लोकसभा निवडणुकीत आपण खासदार निवडून देतो आणि आपण निवडलेले खासदार पंतप्रधान निवडतात. मात्र मागील दहा वर्षांपासून या देशात एक नवीन परंपरा सुरू झाली असून पंतप्रधान पदाच्या उमेदवार सर्वात आधी घोषित होतो. ते संभावित खासदारांना तिकीट वाटप करतात आणि या देशात आता खासदारांच्या कर्तुत्वावर नाही तर देशाच्या नेतृत्वावर खासदार निवडण्याची अनोखी प्रथा सुरू झाली आहे. आणि म्हणून आज देशातील भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आपल्या कर्तुत्वावर नाही तर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर मत मागताना दिसत आहेत.
यात शिरपूर तालुक्याचे दुर्भाग्य असे की शिरपूर तालुका जरी धुळे जिल्ह्यात येत असला तरी लोकसभेसाठी तो नंदुरबार जिल्ह्यासाठी मतदान करतो. आणि आपल्या जिल्ह्यातील साक्री तालुका देखील नंदुरबार जिल्ह्यात मतदान करतो. त्यामुळे धुळे जिल्ह्याची दोन खासदारांसाठी मतांची विभागणी होते. उर्वरित धुळे जिल्हा मालेगाव मतदारसंघात मतदान करतो. त्यामुळे धुळे जिल्ह्यावर हा एक प्रकारे राजकीय अन्याय होत असून त्यामुळे खासदार देखील जिल्हा विभागणीमुळे धुळे जिल्हा पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही.
नंदुरबार जिल्हा मतदार संघ हा पारंपारिक काँग्रेसच्या गड मानला जात होता. या मतदारसंघात काँग्रेसने तब्बल नऊ वेळा माणिकराव गावित यांच्या रूपाने खासदार दिला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत मोदी लहर च्या प्रवाहात या जिल्ह्यात सत्तांतरण झाले आणि पहिल्यांदाच डॉक्टर हिना गावित या खासदार झाल्या. यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत देखील विजय प्राप्त केला. आता पुन्हा तिसरांदात एक लोकसभेसाठी प्रचार करत आहेत. मात्र मागील दहा वर्षातील केंद्र सरकारवर असलेली नागरिकांची नाराजी, भारतीय जनता पार्टीचे जातीपातीचे राजकारण, देशातील महागाई बेरोजगारी इत्यादी बाबत जनता आता जागृत झाली असून देशात भाजपा विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड संताप आहे. विरोधी पक्षांप्रती असलेले फोडाफोडीचे राजकारण, उघडपणे भ्रष्टाचाऱ्यांना समर्थन, संविधानिक संस्थांच्या गैरवापर, न्यायपालिकेवरील आक्रमण, सरकारी यंत्रणेच्या गैरवापर, देशात असलेली अघोषित हुकूमशाही , शेतकऱ्यांची झालेली फसवणूक , दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने मतदारांची झालेली फसवणूक इत्यादी कारणांमुळे मोदी सरकारच्या विरोधात जनभावनात तीव्र आहे. दहा वर्ष देशावर राज्य केल्यानंतर विकासाच्या नावाने मत मागण्याच्या ऐवजी भाजपा धर्माच्या नावाने राम मंदिराच्या नावाने, मत मागताना दिसत आहेत.
डॉक्टर हिना गावित आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत फक्त केंद्राच्या योजना जाहीर करण्याचे आणि घोषित करण्याचे काम केले आणि विकास कामांच्या निधी मंजूर करण्याचे काम केले. विविध लाभार्थ्यांना वेळेस त्यांच्या लाभापासून वंचित ठेवून त्यांची यादी तयार करून राजकीय श्रेय लाटण्यासाठी योजनांचे वितरण कार्यक्रम करण्यात आले.या व्यतिरिक्त ते मतदारसंघात जनसंपर्क ठेवण्यात अपयशी ठरले आहेत .या देशातील युवकांच्या मूलभूत गरजा रोजगार देण्यात ते अपयशी ठरले आहेत. रोजगाराबाबत त्यांचे आजही कोणतेही स्पष्ट विजन नाही. केंद्राने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही आणि ते त्यास मुक संमती देतात. महागाईच्या बाबतीत ते बोलताना दिसत नाहीत. उद्योग व्यवसाय निर्माण करण्याकडे त्यांच्या कोणताही कल नाही. वारंवार आश्वासन देऊन देखील साखर कारखाना व सहकारी संस्थांच्या बाबत कोणत्याही ठोस काम न केल्याने तालुक्यात बेरोजगारीला बहर आला आहे.
शिरपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेऊन दोन वेळा खासदार होऊन देखील त्यांचे साधे संपर्क कार्यालय देखील या तालुक्यात नाही. त्यामुळे सरळ सरळ जनतेची नाळ जोडण्यात त्यांना अपयश आले आहे. खासदार जेव्हा जेव्हा शिरपूर तालुक्यात येतात तेव्हा शासकीय कार्यक्रम राबवण्यासाठी येतात एखादी शासकीय मीटिंग घेण्यासाठी येतात अथवा भूमिपूजन किंवा उद्घाटनला येतात. यासाठी बोटावर मोजण्याचे कार्यकर्ते यांनाच ते भेटी देतात. हे कार्यकर्ते म्हणजेच आपला तालुका असे ते समजतात. हे कार्यकर्ते त्यांचे लाभार्थी सहकारी आणि तेच त्यांचे ठेकेदार. त्यांना जरी वारंवार उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार प्राप्त होत असले तरी जनतेच्या मनातील संसद रत्न होण्यात त्यांना खरोखर अपयश आलेले आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी करोडो रुपयांच्या निधी त्यांनी तालुक्यासाठी मंजूर केला. आणि विकास कामांची रेलचेल दाखवण्यात आली. यात फक्त पंधरा ते वीस टक्के कामे पूर्ण झाली आले असून इतर सर्व कामे फक्त भूमिपूजन झाले असून आचारसंहिता कारणास्तव त्यांच्या वर्क ऑर्डर पेंडिंग आहेत. त्यामुळे क्या खोया क्या पाया अशी तालुक्याची परिस्थिती आहे. मात्र फक्त सरकारी निधीच्या विनियोग करून विकास कामे मंजूर करणे आणि ठराविक कार्यकर्त्यांचे पालन पोषण करणे, हेच फक्त खासदारांचे कर्तव्य आहे का? असा प्रश्न आता तालुक्यातील जनता विचारत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकास कामांच्या मंजूर करताना होणारा टक्केवारीच्या खेळ जनतेस सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेले कामे किती उत्कृष्ट आणि किती निकृष्ट याची कारण मीमांसा देखील केली गेली पाहिजे. नेमका कोणी लाभ साधला हे देखील जनतेला माहित आहे.
त्यामुळे या निवडणुकीत सत्तेत राहिल्यानंतर ची नाराजी उफाळून आली असून त्यांची वाट बिकट आहे. मणिपूर सारखा घटनांवरून आदिवासी समाज आज देखील नाराज असून त्यांनी भाजपाकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यात झालेली सांगवी दंगल राजकीय परिणाम देखील यावेळेस भोगावे लागणार आहेत. त्यामुळे विरोधकांसोबत तालुक्यात असलेला अंतर्गत भाजपच्या विरोध देखील यावेळी भोगावा लागण्याची शक्यता आहे. आजवर विरोध करणारे स्वपक्षीय नेते अचानक भाजपच्या पट्टा गळ्यात टाकून प्रचाराला फिरत खरे असले तरी कितपत साथ मिळेल याबाबत देखील साशंकता आहे. यापूर्वी त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तालुक्यात काही विकास कामांना देखील ब्रेक लावण्यात आला होता. ज्यांची काम थांबवण्यात आली त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
दुसरीकडे जनता आता जागृत अधिक सुज्ञ झाले असून आम्ही आमच्या खासदार खासदारांच्या कर्तुत्वावर निवडायच्या की देशाच्या नेतृत्वावर याबाबत आता सक्षमपणे विचार करत आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील गावित यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. त्यात त्यांचे सक्षम विरोधक के.सी .पाडवी यांनी आपले सुपुत्र एडवोकेट गोवा पाडवी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे. काँग्रेस आपले पूर्वीचे गतवैभव या मतदारसंघात प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहे. एडवोकेट गोवाल पाडवी हे सुशिक्षित युवा उमेदवार म्हणून लोकांसमोर जात आहेत. यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे देखील साथ मिळत आहे. यापूर्वी राहुल गांधी यांचे नंदुरबार जिल्ह्यातील झालेल्या यात्रेनेदेखील जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळाले आहे. तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांची राजकीय पार्टी कोरी असल्याने त्यांच्यावर जनता विश्वास करू शकते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आपला गड पुन्हा जिंकणार असा विश्वास व्यक्त होत आहे.
लोकांची मोदींवरील नाराजी, स्थानिक खासदारांविषयी असलेली नाराजी , जिल्हाअंतर्गत राजकारण, महाविकास आघाडीची साथ, आणि लोकांच्या मनातील राग या सर्वांच्या ते किती प्रमाणात लाभ घेण्यात यशस्वी होतात हे निवडणुकी अंतिम समोर येईल.
याच मतदारसंघात सुशीलकुमार पावरा सारखा बिरसा फाइटर्सचे संस्थापक अध्यक्ष असलेल्याला इमानदार आणि युवा नेत्याचे देखील अपक्ष म्हणून आव्हान आहे. आजवर त्यांना अनेक पक्षांच्या ऑफर मिळाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यांना 50 पेक्षा अधिक संघटनांच्या पाठिंबा प्राप्त असून गावोगावी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांवर प्रभाव असून 300 पेक्षा अधिक संघटना त्यांच्या कार्यरत आहेत. आदिवासी बांधवांसाठी आजपर्यंत त्यांनी फार मोठा संघर्ष करून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील ज्या दिवशी त्यांची मोठी नाळ जोडली गली आहे.
त्यामुळे सुशीलकुमार पावरा निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्यास आदिवासी मतांची विभागणी होणार आहे. याच्या फायदा कोणाला होणार याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
त्यामुळे या सर्व राजकीय प्रवाहात कोणाचे पारडे जड आणि कोण बाजी मारेल हे येणारे काळ ठरवेल मात्र या मतदार संघाचा कल हा परिवर्तनाकडे दिसून येत आहे. याच्या फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
