त्यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव होता, खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचे मोठे विधान
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील प्रमुख चेहरा असलेले एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्यावर तपास यंत्रणांच्या दबाव होता म्हणून त्यांनी भाजपात पक्षप्रवेशाच्या निर्णय घेतला असावा असे मत व्यक्त केले.
खडसेंनी नाईलाजाने निर्णय घेतला असावा. त्यांच्यावर तपास यंत्रणांचादबाव होता असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा हल्लबोलही केला आहे.
टीका करणे हे पंतप्रधानांचे काम आहे का?
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. "आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता. आता तोच देश निर्यात करत आहे. आज मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे त्यांचे काम नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत" असे शरद पवार म्हणाले.
शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा सुरू
पुढे पवार म्हणाले, "आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे याचा अर्थ ही हुकूमशाही आहे. एखाद्याला वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी असं कधी होत नव्हतं. त्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. याचाच प्रभाव खडसेंवर झाला असावा. त्यांच्यावरही तपास यंत्रणांचा दबाव होता. त्यामुळेच त्यांनी नाईलाजाने असा निर्णय घेतला असावा", असे शरद पवार म्हणाले.
मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही याशिवाय, "बाबासाहेबांनी शेवटच्या माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केला होता. आता लोकांना मोदी नको आहेत. हुकूमशाही नको, लोकशाही पाहिजे आहे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
त्यामुळे सध्या प्रत्येक मतदारसंघात बोलताना शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावर उघड टीका करताना दिसत आहेत.
