पाच लाखांपर्यंतच्या ठेवीधारकांनी विमा दाव्याचे अर्ज भरावेत, मर्चंट बँकेचे चेअरमन डॉ.मनोज महाजन यांचे आवाहन
शिरपूर : येथील दि शिरपूर मर्चंट बँकेत पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे विम्याच्या रकमा अदा करण्यात येणार असून ठेवीदारांनी मर्चंट बँकेत जाऊन दाव्याचे अर्ज भरावेत असे आवाहन बँकेचे चेअरमन डॉ.मनोज महाजन यांनी केले आहे.
डॉ.महाजन यांच्या पत्रकानुसार, मर्चंट बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँकेचे विमा संरक्षण प्राप्त आहे. बँकेच्या सद्यस्थितीत, अशा ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या रकमा मिळाव्यात यासाठी रिझर्व्ह बँक, डीआयसीजीसीसह विविध संस्थांकडे पाठपुरावा सुरु होता. त्याला यश प्राप्त झाले आहे. डीआयसीजीसीतर्फे बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या सुमारे 70 कोटी रुपयांच्या रकमा अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रकमा प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित ठेवीदारांनी विम्याच्या दाव्याची कागदपत्रे 23 मे पर्यंत सादर करावयाची आहेत. त्यासंबंधातील दावा अर्ज व अन्य माहिती ठेवीदारांसाठी बँकेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अर्जांसोबत स्वत:च्या आधार लिंक असलेल्या पर्यायी बँक खात्याचा तपशीलदेखील जोडावयाचा आहे. पाच लाखांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांनी बँकेत जाऊन अर्ज भरावेत असे आवाहन डॉ.मनोज महाजन यांनी केले आहे.
