भाजपच्या योजना जनतेसाठी की भाजप परिवारासाठी
वास्तव - महेंद्रसिंह राजपूत
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी जनकल्याणासाठी त्यांच्या पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या योजना व त्यातून जनतेला मिळालेला लाभ या आधारे प्रचार करत आहे. आम्ही तयार केलेल्या योजना कशा अभिनव आहेत आणि त्या जनमानसापर्यंत कशाप्रकारे पोहोचल्या हे प्रचारातून अधोरेखित करण्याच्या प्रयत्न करत आहेत. अर्थात यातल्या काही योजना या आभासी होत्या त्यांच्या घोषणा झाल्या खऱ्या पण त्या जनतेपर्यंत पोहोचल्याच नाही. काही प्रमाणात या योजनांच्या फायदा जनतेला झाला हे देखील सत्य नाकारता येणार नाही. बाकी योजनांचा फायदा हा दलाल आणि ठेकेदारांनी घेतला आहे.
मात्र जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही योजना भाजप सरकारने तयार केल्या त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याऐवजी ते भाजप परिवारानेच लाटण्याच्या प्रयत्न केला असा देखील प्रकार समोर आला होता. त्यामुळे भाजपचे मंत्री जनतेसाठी काम करतात की आपल्या मुलांसाठी असा देखील प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
शिरपूर मध्ये नमो संवाद मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. यात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात मोदींच्या योजना पोहोचवण्यात कमी पडलो असे विधान केले होते. या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या असत्या तर खूप मोठे काम झाले असते अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जाण्याची वेळ आली नसती असे देखील मत त्यांनी व्यक्त केले होते.
मात्र या योजना जनतेपर्यंत जरी पोहोचल्या नसल्या तरी परिवारापर्यंत व भाजप परिवारापर्यंत पोहोचवण्यात मात्र भाजप सरकारला व त्यांच्या मंत्र्यांना यश आले आहे. मागील काळात किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना चालना देण्यासाठी योजना अमलात आणली होती. या योजनेअंतर्गत नंदुरबार मतदार संघात खुद्द विजयकुमार गावित यांची सुपुत्री सुप्रिया गावित यांच्या रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शिवाय शिरपूर तालुक्यातील मधुर फूड पार्क या संस्थेला देखील दहा कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले होते.
यांच्या प्रकल्पांना शासनाने मंजुरी देऊन त्यांना अनुदान दिले यात काही गैर नाही. कदाचित त्यांच्या प्रकल्प परिपूर्ण असेल अथवा त्यांचे राजकीय वजन जास्त असेल. इतर पात्र लाभार्थी योजनेत कुठेतरी कमी पडले असतील असेही मानायला हरकत नाही. मात्र ही योजना आणि तिच्या लाभ ही जनसामान्यांपर्यंत न पोहोचता तो मात्र भाजपमंत्र्यांच्या घरात आणि भाजपच्या परिवारात गेला म्हणून काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर आक्षेप नोंदवला होता. सदरच्या लाभ फक्त याच व्यक्तींना का देण्यात आला याबाबत शंका उपस्थित केली होती. मात्र यावेळी भारतीय जनता पार्टी कडून सदरची योजना ही प्रभावीपणे नियम कायद्यानुसार राबविण्यात आली असून योग्य त्या पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात आला असा खुलासा करण्यात आला होता. यासाठी फक्त भाजप परिवारातील लोकच पात्र होते हा विषय वेगळा.
किसान संपदा योजनेच्या लाभार्थ्यांची यादीत सुप्रिया गावित यांच्या रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटींची सबसिडी मिळाली एवढेच नव्हे तर भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीचा देखील मिळाली आहे. किसान संपदा योजना शेतकऱ्यांची आहे लाभार्थी यादी मात्र भाजप मंत्र्यांची आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी योजना आहे योजनेच्या लाभ मात्र भाजप नेते घेत आहे योजनेमुळे शेतकऱ्याची उत्पन्न तर वाढली नाही भाजपात भरती झालेल्या नेत्यांची उत्पन्न कोटी कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे जिथे लाभ तिथे भाजप परिवार आहे का ? असा देखील प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी विचारला होता.
भाजप परिवारात वडील मंत्री एक मुलगी खासदार आणि दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी हाच परिवार वाद पंतप्रधान मोदींना संपवायचे आहे का? ना खाऊंगा ना खाने दूंगा ढोल वाजवत मते घेणाऱ्या सरकारने जनतेसाठी काम करायचे असते मात्र या प्रकरणात विपरीत घडले असा देखील आरोप यावेळी झाला होता. सदरच्या घटनेत कुंपणात शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करावी असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता.
पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणतात आणि त्यांच्या पक्षाचे लोक मलिदा लाटण्यात व्यस्त आहेत. याकडे पंतप्रधानांचे लक्ष नाही का? त्यामुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शासनाच्या योजना जनतेसाठी ही भाजप परिवारासाठी असा प्रश्न हा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. आणि भाजपच्या योजना जनतेसाठी की भाजप परिवारासाठी असा खोचक प्रश्न त्यांनी देखील उपस्थित केला होता.
