श्रीशिवछत्रपतींचे सरदार नर्मदापार वीर नेमाजीराजे शिंदे यांच्या अर्धाकृती मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न प्रतिनिधी दत्ता पारेकर




श्रीशिवछत्रपतींचे सरदार नर्मदापार वीर नेमाजीराजे शिंदे यांच्या अर्धाकृती मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 

पुणे:यवतमाळ  जिल्ह्यातील सायखेडा खुर्द या गावी श्री. केशवराव माधवराव शिंदे पाटील द्वारानिर्मित श्री राधाकृष्ण देवस्थान परिसरात शिंदे कुळाचे कुलभूषण श्रीशिवछत्रपतींचे सरदार वीर नेमाजीराजे शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नुकताच  संपन्न झाला. शिंदे पाटील घराण्याचे जेष्ठ पुत्र मा. श्री. पार्थ प्रकाशराव शिंदे पाटील यांच्याद्वारे पुतळ्याची स्थापना व अनावरण सोहळ्याचे आयोजन केले होते. नेमाजी राजे शिंदे यांचा इतिहास मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे द्वारा प्रकाशित 'सरंजामी मरहट्टे' या ग्रंथामध्ये प्रकाशित झाला आहे. इ. स. 1690 ते मृत्यूपर्यंत त्यांची विशेष कारकीर्द आहे. त्यांचे मूळ स्थान व वतने अंजनडोह-पोथरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असून औरंगजेब दक्षिणेत असताना उत्तरेत नर्मदापार करून भोपाळ- सिरोंजपर्यंत पराक्रम गाजविणारा पहिला मरहट्टा सरदार होय. यवतमाळ सह बारा गावांची वतनदारी त्यांचे कडे होती. 

            सरदार नेमाजी राजे शिंदे यांच्या अर्धाकृती मूर्तीचे अनावरण भागवतकार ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज सुरजुसे,  श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर-राज घराणे इंदोर व यवतमाळ सह परिसरातील मान्यवर मंडळींच्या हस्ते, भगवान श्री राधाकृष्ण व हनुमंत राय तसेच शिंदे पाटील कुळाची कुलदेवता व पूर्वजांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायखेडा येथील ज्येष्ठ नागरिक श्री छत्रपती इंगळे गुरुजी,  प्रमुख अतिथी म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सुरजुसे, श्री वामनराव राऊत महाराज, मूर्तिकार श्री सचिनजी वायकळे बोरीसिंह, श्री महेशजी जोशी साहेब श्री वसंतराव ढोके साहेब आदी मान्यवर मंडळी लाभली. श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने पुतळ्याचे अनावरण करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यवतमाळ सह पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमुख अतिथी व नेमाजीराजे शिंदे यांच्या अर्धाकृती मूर्तीला तयार करणारे श्री. सचिनजी वायकुळे यांना शालश्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मान्यवर मंडळींनी नेमाजी राजे शिंदे यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. श्री ज्ञानेश्वर महाराज सुरजुसे यांनी स्वयंरचित पोवाडा सादर केला.

                   यवतमाळ- सायखेडा सह पंचक्रोशीतील रुई वाई बोरीसिंह बेलोरा व जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून शूर वीरांबद्दल आस्था प्रेम जिव्हाळा असणारे या ठिकाणी येऊन त्यांनी वीर नेमाजी राजे शिंदे यांना मानवंदना दिली. गणमान्य लोकप्रतिनिधी माननीय श्री संजय भाऊ देशमुख, श्रीमती सुशीला ताई उत्तमराव पाटील, श्री किशोर भाऊ इंगळे, श्री गजानन भाऊ पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवून मानवंदना दिली. नेमाजी राजे शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या स्थापनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात छत्रपतींचे छत्र निर्माण झाल्याचा आनंद रयतेने व्यक्त केला. शिंदे पाटील कुटुंबातील सौ प्रभाताई राजे,  श्री पार्थ राजे, सौ संध्या राजे, संदीप राजे, दुष्यंत राजे, लक्ष्मी राजे, वेदांगी राजे, प्रणव राजे आवर्जून उपस्थित होते. सौ संध्या पार्थ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने