प्रकल्प सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणार.....* प्रतिनिधी सुमित गिरासे शहादा




*प्रकल्प सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणार.....* 

प्रतिनिधी सुमित गिरासे शहादा

     परिसर विकासासह प्रकल्पांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वजण सोबत राहू असा सूर आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित,शहादा- तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्यासह मान्यवरांनी रविवारी झालेल्या जाहीर आभार सभेत व्यक्त केला.
     लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी उंटावद-होळ ता. शहादाच्या संचालक मंडळ निवडणुकीत लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी परिसराचे नेते तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील हे होते. यावेळी डॉ. विजयकुमार गावित, आ. राजेश पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भामरे, ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे, माजी सभापती माधवकाका पाटील, ज्येष्ठ नेते ईश्वर मंगेश पाटील, जिप कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी पंचायत समिती उपसभापती बापूजी जगदेव, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा .संजय जाधव, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग आहेर, ईश्वर भुता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    डॉ. गावित यावेळी बोलतांना म्हणाले, स्वर्गीय अण्णासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत परिसर विकासाचे प्रकल्प सुरू केले. सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या या प्रकल्पांना सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शेती व सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासोबतच तंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार. केंद्र व राज्य सरकारकडून केळी,पपई,ऊस, कापूस आदी पिकांना योग्य भाव देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.शेतशिवारांसह परिसरातील रस्त्यांचे प्रश्नही सोडवू. प्रकाशा येथे महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरू करण्यासोबतच गुर्जर समाजभवनासाठी पाच कोटी रुपयांच्या निधी मंजूर करणार. नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येत असल्याचेही डॉ. गावित यांनी म्हटले.
    आ.पाडवी यावेळी बोलतांना म्हणाले, सूतगिरणी व सातपुडा साखर कारखाना सुरू व्हावे हाच आपला उद्देश असून शासनाकडे पुनर्वसन कर्जासाठी पाठपुरावा सुरू आहे. सहकार व शिक्षणातून परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासह प्रत्यक्ष कार्यातून विश्वास व विजय संपादन करता येतो. फक्त मोठमोठी भाषणे देऊन नव्हे. सूतगिरणी निकालानंतर कुठेही अटीशर्ती व अटीतटी दिसून आली नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
  अध्यक्षीय समारोपात बापूसाहेब दीपकभाई पाटील म्हणाले, शेतकरी शेतमजूर कामगारांसह सर्वच घटकांचा आर्थिक विकास व्हावा. छोटा माणूस ताठ मानेने जगायला पाहिजे हेच स्वर्गीय अण्णासाहेबांचे तत्व होते. त्यांनी उभारलेले प्रकल्प सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत आहेत.यातून बाहेर काढण्यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत परिश्रम घेऊ. शेतकरी सभासदांची बाकी देण्यासाठी सरकार सोबतच विविध संस्थांकडून पैसा उभा करू. त्यासाठी आपणा सर्वांच्या साथीची गरज आहे. सभासदांनी व शेतकरी बांधवांनी चुकीच्या व्यक्तींच्या नादी लागू नये. आपण सारे जण या सहकारी प्रकल्पांचे मालक आहात. मालकांसारखेच राहा. सहकार चळवळ जिवंत ठेवणे आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे. हजार दोन हजारात आपले मत विकू नये. अयोग्य व्यक्तींना कदापि थारा देऊ नये असेही त्यांनी म्हटले.
    यावेळी डॉ. कांतीलाल टाटिया, ज्ञानेश्वर भामरे, प्रा. मकरंद पाटील, घनश्याम पाटील, सुप्रिया गावित यांनी परिसरातील प्रकल्पांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याविषयी सूर व्यक्त केला. तत्पूर्वी रतिलाल पाटील पाडळदा, जगदीश पाटील निजर, सुनील पाटील शहादा, अनिल भामरे मंदाना ,प्राचार्य मेहमूद खाटीक शहादा, जिजाबराव पाटील धमाने, सुनीलभाई पटेल सुरत,भरत पाटील कोळदा, पांडुरंग चौधरी वडाळी,राजेंद्र वाघ सोनवद ,महेंद्र पाटील नंदुरबार यांची समायोजित भाषणे झाली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी केले. आभार मयूर दीपक पाटील यांनी मानले.
    यावेळी जे.पी.पाटील, सुनील सखाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील, उद्धव रामदास पाटील, ज्ञानेश्वर भिका चौधरी, रवींद्र रावळ, जगदीश पाटील, अनिल कुवर, सौ.जयश्रीबेन पाटील,सौ.माधवीबेन पाटील,अरविंद पाटील, सुनील रोहिदास पाटील,संजय दशरथ पाटील,डॉ.हेमंत सोनी, किशोर मोरे, सतीष जव्हेरी, रमाशंकर माळी,प्रा.आर.टी.पटेल,प्रा.एन.जे.पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने