तालुक्यात खासदारांची विकास कामांची लाट
स्थानिक आमदारांनी कार्यक्रमांकडे फिरवली पाठ
राजकारण - महेंद्रसिंह राजपूत
देशात एकीकडे भारतीय जनता पार्टी 370 पार आणि ४oo पार च्या घोषणा देत असताना निवडणुकीच्या तोंडावर शिरपूर तालुक्यात मात्र भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदार यांच्यात मात्र राजकीय चुरस व श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून विकास कामांच्या आडून एकमेकांवर राजकीय कुरघोडी, द्वेष आणि श्रेय वादाचे राजकारण सुरू आहे का ?असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
शिरपूर तालुक्यातील राजकीय परिस्थितीच्या आढावा घेता आमदार अमरीश भाई पटेल यांच्या भाजपा प्रवेशानंतर संपूर्ण तालुका भाजपामय झाला आहे. या तालुक्यात इतर पक्षांचे अस्तित्व नगण्य आहे. तालुक्याला भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार असे दोन आमदार भाजपचे असून धुळे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार म्हणून डॉक्टर हिना गावित कार्यरत आहेत. असे सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे एकपक्षीय नेते असताना देखील तालुक्यात मात्र वारंवार विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार यांचे दोन वेगवेगळे गट तालुक्यात निर्माण झाले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मागील काही काळापासून खासदार हिनाताई गावित यांनी शिरपूर तालुका यासाठी दिलेल्या भरीव निधी आणि त्यातून घेण्यात आलेल्या जनकल्याणांच्या विकास कामांची भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण अशा कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. त्यांनी आपल्या विकास निधीतून शिरपूर तालुक्यासाठी अनेक गावांना करोडो रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक ठिकाणी विकास कामे सुशोभीकरण, सामाजिक सभागृह, मंदिर बांधकाम, रस्ते पाणी वीज, गॅस ,घरकुल अशा केंद्राच्या कल्याणकारी योजनातून तालुक्यात लाभ देण्याच्या प्रयत्न केला आहे.
यापूर्वी देखील शिरपूर तालुक्यात देशातील इतर खासदारांच्या निधीच्या वापर करून विकास कामे करण्यात आले आहेत. आता सुद्धा पंचायत समिती शिरपूरच्या नूतनीकरणासाठी मुंबई येथील एका बड्या नेत्याच्या निधीतून निधी प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अशा परिस्थितीत शिरपूर तालुक्यातून निवडून गेलेल्या खासदाराने तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर यात वावगे काय? असा सामान्य प्रश्न मतदाराच्या मनात येतो.
मात्र ज्या ज्या वेळी खासदार गावित आणि मंत्री विजयकुमार गावित हे शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले व त्यांनी तालुक्यात कार्यक्रम घेतले यावेळी त्यांच्यासोबत ज्या सरपंच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात कामे देण्यात आली ते आणि काही निवडक कार्यकर्ते फक्त दिसून आले. कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनर्सवर तालुक्यातील आमदार अमरीश भाई पटेल आमदार काशीराम पावरा व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे पत्रिका व बॅनरवर असून देखील या सर्वांनी अनेक वेळा या सर्वच कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. काही राजकीय व्यस्त कार्यक्रमांमुळे मोठे नेते जरी या कार्यक्रमाला दांडी मारत असले तरी कार्यकर्ते सुद्धा याकडे फिरकत नाहीत असे देखील प्रकर्षाने जाणवले आहे.
अनेक वेळा मंत्र्यांनी खासदार शिरपूर शहरात येऊन देखील त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांना भेट देण्यास असमर्थता दाखवली आहे. अथवा टाळाटाळ केली आहे. त्यामुळे हा राजकीय तिरस्कार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
नुकतेच भाटपुरा जिल्हा परिषद गटातील विकास कामांच्या उद्घाटन ,लोकार्पण, व भूमिपूजनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला देखील आमदार अमरीश भाई पटेल यांच्या गटातील सर्वांनीच पाठ फिरवली. त्यामुळे एकाच पक्षात काम करत असताना एकमेकांच्या द्वेष का हा प्रश्न आता मतदाराच्या मनात निर्माण होत आहे.
खासदार हिना ताई गावित यांनी होलनांथे येथील जाहीर सभेत बोलताना स्पष्ट उल्लेख केला होता की तालुक्यात माझे राजकीयदृष्ट्या मला अडवण्याचे काम सुरू असून मला राजकीय विरोध केला जात आहे. मात्र माझी देखील राजकीय झेप मोठी असून असे सर्व अडथळे मी पार करण्याची क्षमता ठेवते असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
त्यामुळे शिरपूर तालुक्यात भाजप खासदारांचे राजकीय दृष्ट्या विरोध करणारे नेमके कोण? असा सामान्य प्रश्न आता तालुक्यातील नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे.
मागील काळात मंत्री विजयकुमार गावित यांच्या निधीतून तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जवळपास 30 गावांसाठी जवळपास 350 कामे ही करोडो रुपयांची कामे ही मंजूर करण्यात आली होती. मात्र या विकास कामांवर आक्षेप घेत खुद्द तालुक्याचे आमदार अमरीश भाई पटेल यांनी पत्र देऊन हरकत घेतल्याने या कामांना स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना व ज्या ज्या भागात ही कामे देण्यात आली होती त्यांची प्रचंड प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेल्या आमदार अमरीश भाई पटेल यांनी तालुक्यातील विकास कामांना विरोध करावा इतकी टोकाची भूमिका का घेतली? याबाबत कार्यकर्ता आज देखील संभ्रमात आहे. भाईंसारख्या परिपक्व नेत्यांनी अशी राजकीय भूमिका घेणे यामागे फार मोठे राजकारण असू शकते असं देखील अंदाज व्यक्त होत आहे.
आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर या कामाबाबत काही मार्ग न निघाल्याने ही सर्व कामे रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे मंत्री आणि खासदारांनी तालुक्यात कामे द्यावीत आणि स्थानिक आमदारांनी मात्र एक तर त्या कामांना विरोध करावा अथवा त्या कामांच्या उद्घाटनाला पाठ फिरवावी असा एक कलमी कार्यक्रम जाहीरपणे होत असताना दिसत आहे.
या सर्व बाबींच्या राजकीय दृष्ट्या विचार केला तर ही सर्व राजकीय श्रेय वादाची लढाई आहे असे प्राथमिक दृष्ट्या दिसून येते. शिरपूर तालुक्यात आजपर्यंत मागील 35 पेक्षा अधिक वर्षांपासून विकासाची कामे ही फक्त आमदार अमरीश भाई पटेल यांच्या माध्यमातून झाली. त्यामुळे आमदार अमरीश भाई पटेल यांच्या बालेकिल्ला म्हणून शिरपूर तालुक्याची ओळख आहे. मात्र कुठेतरी या बालेकिल्लाला राजकीय दृष्ट्या खिंडार पडत आहे की काय अशी भावना तयार झाली असून दुसऱ्या राजकीय नेत्यांनी आपल्या तालुक्यात घुसखोरी करून विकास कामे करत आहेत असा राजकीय भास निर्माण होऊन हा विरोधाभास निर्माण होत आहे का? अशी देखील शंका आता नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे.
तालुक्यातील पिडीत शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रकरणात देखील श्रेयवाद सुरू असून आमदार अमरीश भाई पटेल गटाकडून आमच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांना पीक विमा च्या लाभ मिळाला असे वृत्तपत्रातून बातम्या देऊन जाहीर केले जात आहे तर दुसरीकडे खासदार हिनाताई गावित यांनी देखील भर सभेत दावा केला आहे की मी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषिमंत्री चर्चा करून याबाबत तोळगा काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना 30 करोड रुपयांच्या पिक विमा च्या लाभ मिळवून दिला आहे. यापूर्वी तालुक्यात अशा प्रकारचे राजकीय श्रेयवाद व वर्चस्ववाद लोकांनी अनुभवला नव्हता.
गोपनिय सूत्रांच्या माहितीवरून अशी देखील माहिती समोर आली आहे की शिरपूर तालुक्यातील राजकीय बंगल्यावरून कार्यकर्त्यांना इतर नेत्यांच्या कार्यक्रमात हजर न राहण्याबाबत आदेश करण्यात आले असून जे नेते आणि कार्यकर्ते अशा कार्यक्रमांना हजेरी लावतील त्यांनी त्या गटासाठी काम करावे अशी सूचना वजा इशारा देण्यात आल्याची देखील बातमी आहे. अर्थात यात किती सत्यता आहे हे काही काळाने समोर येईलच.
मात्र आता देशात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या मार्गावर आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा खासदारकीचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नात असलेल्या खासदार हिनाताई गावित आणि मंत्री विजयकुमार गावित यांना शिरपूर भाजपच्या नेत्यांकडूनच विरोध होत आहे का? हा विरोध लोकसभा निवडणुकीत देखील दिसून येईल का? याचे तालुक्यावर काय दुरगामी परिणाम होतील? यापूर्वी काँग्रेसमध्ये धुळे जिल्ह्यात ज्याप्रमाणे जवाहर आणि अँकर गट अनेक वर्ष सक्रिय होते त्याच धर्तीवर शिरपूर तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीत दोन गट तयार होतील का? अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी काय करावे? कोणाची कास धरावी? झेंडा एक आणि नेते दोन अशी विपरीत परिस्थिती तालुक्यातील कार्यकर्त्यावर येऊन ठेपले आहे का? असे अनेक प्रकारचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
याबाबत राजकीय समीक्षक यांना असे वाटते की वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन सदरच्या वाद हा मिटवण्यात येईल. मात्र जर या नेत्यांमध्ये खरोखर वाद असेल आणि तो जर इतक्या टोकाला गेला असेल? तर मग हा वाद मिटवण्यात आजपर्यंत वरिष्ठ यशस्वी का झाले नाहीत? त्यांना हा वाद मिटवायचा होता की वाढवायचा होता असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जर तालुक्यात लोकसभा निवडणुकीत दोन गट पडले तर विधानसभेचे चित्र काय असेल याच्या देखील अंदाज राजकीय समीक्षा घेत आहेत. अर्थात भाजपा सारखा बलाढ्य पक्षात असे होणे शक्य नाही. आणि कोणी असे करत असेल तर त्याला देखील राजकीय परिणाम भोगावे लागतील हे देखील तेवढेच सत्य आहे.
मात्र एक कलमी आणि एकछत्री राजकीय वर्चस्व असलेल्या शिरपूर तालुक्याला आता श्रेयवाद आणि वर्चस्ववादाची राजकीय लढाई पेटली असून याच्या तालुक्यातील राजकारणावर काय दुर्गामी परिणाम होईल ही येणारे वेळेत सांगू शकेल.
तूर्तास तरी तालुक्यात घडणाऱ्या घटना, होणारे कार्यक्रम, श्रेयवाद आणि राजकीय कुरघोडी , लोकसभेच्या उमेदवारीला होणारा विरोध यांचे राजकारण जोमात आहे असेच दिसून येत आहे. कदाचित लोकसभेची उमेदवारी जाहीर पक्षाकडून झाल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल असे लोकांना वाटत आहे. मात्र हा वाद न मिटल्यास कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणता झेंडा घेऊ हाती अशी विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र असे झाले तर मतदार आणि कार्यकर्ता या दोघांना किंमत येईल हे मात्र नक्की.
