शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. व्ही. के. एम. संस्थेचे ट्रस्टी राजगोपाल भंडारी, शिरपूर शहर पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य निश्चल नायर, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिरपूर शहर पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यावेळी म्हणाले, शिरपूर तालुक्यात एवढी मोठी शाळा आणि येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा पाहून अचंबित झाल्याचे सांगून येथील विद्यार्थी नशीबवान असून त्यांनी उज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे.
जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा कौतुकास्पद आहेत.
प्राचार्य डॉ. पी. सुभाष म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमार्फत अतिशय दर्जेदार व उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालकांनी दाखवलेल्या विश्वासास मुकेश आर. पटेल स्कूल बांधील असून पालकांनी केलेली स्विमिंग पूलची मागणी पूर्ण केल्याचे सांगितले. आज प्रशालेत सर्व सुविधायुक्त स्विमिंग पूलमध्ये विद्याथी प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या आवारात १ लाख ४० हजार स्क़्वेअर फुटचे सर्व सोयी-सुविधायुक्त भव्य इनडोअर स्टेडियम लवकरच सेवेत सादर होत असल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली.
विद्यार्थ्यांनी पथसंचालन, अश्वसंचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडा महोत्सवात १०० मी., २०० मी., ८०० मी., १५०० मी. धावणे, रिले-शर्यत, १०० मी. अडथळ्यांची शर्यत, थाळीफेक, गोळाफेक, कुस्ती, बॉक्सिंग, कॅरम, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, खो-खो, कबड्डी आदी इनडोअर व आऊटडोअर क्रीडाप्रकार घेण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पदके देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
घोडेस्वारी, स्केटिंगचे उत्तम प्रदर्शन, कुडो, बॉक्सिंग व कुस्ती या साहसी क्रीडा प्रकाराची ‘आत्मसंरक्षण’ ही डान्सड्रील यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. प्राचार्य डॉ. पी. सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला. पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शाळेचे प्राचार्य पी. सुभाष यांनी कौतुक केले.
