बालाजी वेफर्सच्या वाहनावर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.... नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




शहादा - बालाजी वेफर्सच्या वाहनावर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

श्री. सुनिल संतोष तिरमले वय-34 वर्षे व्यवसाय मार्केटींग सेल्समन, रा. नागसेन नगर, शहादा हे शहाद्यातील बालाजी वेफर्सचे व्यापारी श्री. अमित जैन यांचेकडेस मार्केटींग सेल्समन म्हणून काम करतात. दिनांक 17/10/2022 रोजी श्री. सुनिल तिरमले व बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक श्री. अजय कैलास कोळी अशांनी शहादा तालुक्यातील विविध खेड्यागावांमध्ये बालाजी वेफर्सचा माल देवून त्यांच्याकडून पैसे घेवून सायंकाळी 06.15 वा. सुमारास औरंगपुर मार्गे शहादा येथे परत येत असतांना औरंगपुर ते शहादा दरम्यान वळण रस्त्याच्या पुढे अज्ञात 04 इसमांनी श्री. सुनिल तिरमले व श्री. अजय कोळी यांचे टाटा मॅजिक चारचाकी वाहनास थांबवून त्यांना चाकुचा धाक दाखवून फिर्यादी श्री. सुनिल तिरमले यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचे हातातील 87,871/- रुपये रोख असलेली रेग्झीनची पिशवी व 3000/- रु कि. चा 1 मोबाईल जबरीने हिसकावून मोटार सायकलने पळून गेले. त्यानंतर श्री. सुनिल संतोष तिरमले वय-34 वर्षे व्यवसाय मार्केटींग सेल्समन, रा. नागसेन नगर शहादा यांचे फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गु.र.नं. 636/2022 भा.द.वि. कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्री. श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक बुधवंत हे घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच धुळे जिल्ह्यातील नंदुरबारलगत असलेल्या पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी करणेबाबत नियंत्रण कक्ष यांना आदेशित केले.

शहादा पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक 17/10/2022 रोजीचा धाडसी जबरी चोरीमधील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून लुटण्यात आलेली मालमत्ता हस्तगत करण्याचे मोठे आवाहन पोलीसांसमोर होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे 06 वेगवेगळे पथके तयार करुन दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

दिनांक 10/11/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मागील महिन्यात औरंगपुर रस्त्यावर बालाजी वेफर्सच्या वाहनावरील मार्केटींग सेल्समैन व चालकाला मारहाण करुन पैसे लुटणारी टोळी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील असून त्या वाहनावरील चालकाचा देखील गुन्ह्यात सहभाग आहे.

सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना कळवून बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक अजय कोळी यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक अजय कोळी याचा कलसाडी गावात जावून शोध घेतला असता तो दोंडाईचा येथे गेल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय कोळी यास ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय कैलास कोळी वय 21 रा. कलसाडी ता. शहादा जि.नंदुरबार असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीताला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हता, म्हणून संशयीत आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून सखोल विचारपूस केली असता, संशयीत आरोपी नामे अजय कोळी याने सदरचा गुन्हा त्याचा चुलत मामा भारत कोळी व त्याचे इतर साथीदार आकाश पाटील, ऋषिकेश गिरासे, आयुष मोरे व एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. दोंडाईचा जि. धुळे अशांनी मिळून भारत कोळी याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1) भारत भगवान कोळी वय 21 रा. म्हाळसा नगर, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे 2 ) आकाश खंडू पाटील वय-21 3) ऋषीकेश ऊर्फ बिच्छु भगवान गिरासे वय-21 दोन्ही रा. रा. संभाजी नगर डाबरी, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे 4) आयुष सुनिल मोरे वय 19 रा. बामणे ता. शिंदखेडा जि. धुळे 5) एक अल्पवयीन मुलगा यांना दोंडाईचा जि. धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 87,800/- रुपये रोख, 2 लाख रुपये किमतीची KTM दुचाकी गाडी 3) 50 हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर मोटार सायकल 4) गुन्ह्यातील चोरीस गेलेला 3000/- रु. कि. चा एक विवो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्या करतेवेळी वापरलेला चाकू असा एकुण 3 लाख 40 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत.

सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईका विकास कापुरे, पोलीस शिपाई विजय ढिवरे, किरण मोरे, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने