आपल्या आयुष्यातील हक्काचे घर असावे असे प्रत्येक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते आणि आपल्या आयुष्यातील पहिल्या घरासाठी सामान्य माणूस फार मोठे स्वप्न पाहून आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीवाची पराकाष्टा करून व आर्थिक ताडमेड बसवून हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.
अशाच प्रकारे आपल्याला हक्काचे घर मिळेल या अपेक्षेत असणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सामान्य नागरिकांचे स्वप्नाची मात्र राग रांगोळी होत असून आर्थिक फसवणूक होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील करवंद येथे जमीन विकत घेऊन राधाकृष्ण नगरी नावाच्या प्रकल्प सुरू करण्याचे घोषित झाले होते. आपण मुंबई येथील फार मोठे बिल्डर आहोत आणि आपण स्वस्तात लोकांना आपल्या हक्काचे घर मिळवून देऊ अशा प्रकारच्या जाहिराती करून व उच्च प्रतीच्या सेवा सुविधा व बँकांचे कर्ज कमी व्याजदर, सरकारी योजनांच्या लाभ, पंतप्रधान योजनेतून सबसिडी व मासिक हप्त्याने फ्लॅट विक्रीचे गाजर दाखवून तालुक्यातील जनतेकडून लाखो रुपयांचे डिपॉझिट व मासिक हप्ते या कंपनीकडून गोळा करण्यात आले. जवळपास 672 घरांच्या हा प्रकल्प त्यातला पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्णत्वास येऊन नागरिकांना दिला जाईल अशी प्रलोभन देणारी जाहिरात बाजी करून या तालुक्यातील शिर्ष नेत्यांना उद्घाटनाला बोलावून व असंख्य सेवा सुविधांच्या लेखाजोखा मांडून जल्लोषात उद्घाटन करण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात 2022 पर्यंत कामाला सुरुवातच न झाल्याने व गुंतवणूकदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पायाभरणी सुरू झाली. लोकांना या प्रकल्पाबाबत संभ्रम व आपली फसवणूक होत आहे की काय ? याची जाणीव झाली आणि आपली भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी ग्राहकांनी तगादा लावण्यात सुरुवात केली. काहींची रक्कम जरी परत करण्यात आली असली तरी अजूनही बहुसंख्य लोकांची रक्कम यात अडकली असून भविष्यात त्यातून आपल्याला घर मिळेल की नाही याची शाश्वती लोकांना वाटत नाही. आणि आता गुंतवणूकदारांना उडवीची उत्तरे दिली जात आहे. काही लोकांना कंपनीकडून अदा करण्यात आलेले धनादेश देखील वटवण्यात आलेले नाहीत, तर दुसरीकडे काही गुंतवणूकदारांकडून आमची फसवणूक झाली म्हणून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी होत आहे.
या प्रकल्पात पंच तारांकित सेवा सुविधा देण्याचे आश्वासन देऊन कंपनी धारकांनी लोकांच्या अपेक्षाभंग करून भावनिक खेळ केला आहे असा आरोप गुंतवणूकदारांकडून होत आहे.
सदर प्रकल्पामध्ये दर्शनी भागावर फार मोठे गेट, प्लेग्राउंड मंदिर काँक्रीटचे रोड आकर्षक रंगसंगती झाडे लावणे ओपन स्पेस, सिक्युरिटी सेवा, शाळा व्यापारी संकुल, एटीएम, वाहनांना हवा भरण्याची सुविधा, इलेक्ट्रॉनिक चार्जिंग सेंटर, व्यायामशाळा,शहरापासून कमी अंतरावर व इतर महत्त्वपूर्ण सेवा सुविधा यासह इतर अनेक सुविधांचे सादरीकरण करण्यात आले होते. या मोहास बळी पडून अनेकांनी आपल्या आयुष्याची कमाई या प्रकल्पात घर घेण्यासाठी लावली आहे.
सदरच्या प्रकल्प हा करवंद गावाजवळील स्टार्च फॅक्टरीच्या जवळच्या परिसरात असल्याने या परिसरात फॅक्टरीतून निर्माण होणाऱ्या दुर्गंधी येथे पसरले आहे अशा वातावरणात गुंतवणूकदार मोकळा श्वास कसा घेणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्यक्षात वेळेत प्रकल्पपूर्तीची कोणतीही चिन्हे दिसत नसून या योजनेअंतर्गत देण्यात आलेली आश्वासने देखील फोल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात प्रत्येक घरकुलधारकास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडी मिळवून देण्याची आश्वासन देण्यात आले होते मात्र सध्या अशा प्रकारच्या सबसिडी बंद करण्यात आले असून त्याच्या लाभ नागरिकांना मिळणे जवळपास शक्य नाही. प्रकल्प लाबल्याने त्याच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या किमतीमध्ये व ज्या आश्वासनाच्या आधारे घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्णपणे न मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्प धारकांनी तालुक्यातील करोडो रुपयांची रक्कम जमा करून प्रत्यक्षात आश्वासन पुरती न केल्याने या प्रकल्पांतर्गत फार मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आता गुंतवणूकदार यांच्याकडून होत असून गुंतवणूकदारांचे रक्कम परत मिळावी व संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी आता मागणी जोर धरत आहे.
तर दुसरीकडे कंपनी धारकांकडून आम्ही कामात सुरुवात केली असून हा प्रकल्प पूर्णपणे कायदेशीर असून यात कोणतीही आर्थिक फसवणूक झालेली नाही काही तांत्रिक बाबींमुळे काम रखडले असून ते आश्वासनाप्रमाणे लवकरच प्रकल्प पूर्णत्वास येईल . जर कोणास याबाबत सासंकता असेल तर त्यास आम्ही व्याजासहित गुंतवणुकीचे पैसे परत करण्यास तयार आहोत असे देखील सांगितले जात आहे. व लोकांना विश्वास देण्याचे प्रयत्न होत आहेत. हे पटवून देण्यासाठी पुन्हा जाहिराती प्रसिद्ध केला जात आहेत.
मात्र या प्रकल्पातील गुंतवणूकदारांच्या विश्वास उडाल्याने आता कंपनीच्या आश्वासनांवर विश्वास करण्याचे धाडस गुंतवणूकदार करण्यास तयार नाही. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वकांक्षी असा घरकुलांच्या हा प्रकल्प वाद्याच्या भोऱ्यात सापडला असून गुंतवणूकदार आपली रक्कम परत मिळण्यासाठी तागाता लावत आहेत. यात काहींना आपली रक्कम परत मिळाले असून काही गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळण्यासाठी आश्वासन देखील देण्यात आले आहे.मात्र गुंतवणूकदारांकडून पुढाकार घेतल्यास याबाबत गुन्हे दाखल होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.





