नंदुरबार - जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
दिवाळी हा सर्व संणामध्ये अत्यंत महत्वाचा सण आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात सर्वत्र साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेगळे क्षितीज, नवे स्वप्न घेवून दिवाळी येत असते. परंतु कोणताही सण असू द्या, पोलीस मात्र त्यांच्या कुटुंबापासून लांब राहून आप कर्तव्य चोखपणे पार पाडत असतात. लोकांच्या जिविताच्या व मालमत्तेच्या संरक्षणासाठी विशेष करुन दिवाळी सणाच्या दरम्यान पोलीस हे स्वतःचा सण बाजुला ठेवून कार्यरत असतात.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांची दिवाळी गोड करण्याची संकल्पना मांडली व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून किती पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जाईल? याची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 39 अमलदारांना आज दिनांक 22/10/2022 रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहणेबाबत कळविले.
दिवाळी बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात बोलविले. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न त्या 39 पोलीस अंमलदारांना पडला, परंतु नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी त्या 39 पोलीस अंमलदारांना सहा पोलीस उप निरीक्षक पदावरुन पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण 39 सहा. पोलीस उप निरीक्षक यांना सेवा जेष्ठतेनूसार पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देऊन दीपोत्सवाची भेटच दिलेली आहे.
पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील 39 पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पोलीस अमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदाचे दोन स्टार लावून पोलीस अमलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, राखीव पोलीस निरीक्षक श्री. देवनाथसिंग राजपुत इत्यादी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मागील एक वर्षाच्या काळात जिल्हा घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस अमलदारांपैकी पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर 71, पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर 60 तर पोलीस हवालदार पदावरुन सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर 47 अशा एकुण 178 पोलीस अमलदारांना पदोन्नतीची भेट दिली असून आज दिनांक 22/10/2022 रोजी 39 सहा. पोलीस उप निरीक्षक यांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
