मलकापूर - उमेश इटणारे
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) मधील पाणपोईची दुरावस्था झालेली असून त्याठिकाणी येणाऱ्या शेतकरी व कास्तकारांना पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा उपलब्ध नसून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण व लघुशंका करण्यासारखे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. तेव्हा याबाबत कृउबास प्रशासनाने तातडीने सदर पाणपोईची झालेली दुरावस्था दूर करून तेथे पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी एका निवेदनाद्वारे कृउबास मुख्य प्रशासक व सचिवड यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, नांदुरा रोडवर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ( मार्केट यार्ड)ची जुनी इमारत व प्रांगण आहे. येथून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज तसेच आजही अनेक गुरांचा बाजार, दररोजच्या भाजीची हर्रासी होत असते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये येणाऱ्या कास्तकार व शेतकऱ्यांसाठी पाणपोईची निर्मिती तर करण्यात आली आहे, मात्र ही पाणपोई पाणीच उपलब्ध नसल्याने ठणठणाट पडलेली असते. त्यामुळे अनेक पाण्याने व्याकुळ झालेल्या शेतकऱ्यांना इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागते. त्याच बरोबर या पाणपोईमध्ये पाणीच नसल्याने याठिकाणी लघुशंके सारखे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याने घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे केली आहे. त्याचप्रमाणे या प्रांगणाचे मोठ्या वाहन धारकांनी वाहन तळ केले असून दिवसा व रात्री याठिकाणी ट्रक, डीसीएम, बंद पडलेली वाहने यासह खासगी वाहने ही सर्रासपणे उभी करून ठेवण्यात येतात. त्यामुळे याठिकानी येणाऱ्या शेतमालाच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होण्या बरोबरच शेतकऱ्यांची गैरसोय सुध्दा होत आहे.
तेव्हा कृउबास. प्रशासनाने या बाबत योग्य ती कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्या बरोबरच परिसरातील साफसफाई व अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई करावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या १६ मार्च पासून बेमुदत आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे.
Tags
news
