कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांचे आदेश, कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन



                       धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यात 30 एप्रिल 2021 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी काढले आहेत.
                  जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, 30 एप्रिल 2021 पर्यंत शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील. या निर्बंधातून मेडिकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे व येणारे कामगारांना सूट राहील. मात्र, संबंधितांनी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
याशिवाय पुढील अत्यावश्यक सेवांना सूट राहील. त्यात हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक, मेडिकल इन्शुरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील), रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बससेवा, मान्सून पूर्व  कामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माल वाहतूक, कृषीशी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा. सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्ययगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहतील. शॉप, मार्केट व मॉल्स : मार्केट व मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देणारे दुकान मालक व दुकानातील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच दुकानातील कर्मचारी व ग्राहकांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक ग्लास किंवा शील्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधा असाव्यात.
                  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : ऑटो रिक्षा - वाहन चालकासह दोन प्रवासी, टॅक्सी (चारचाकी वाहने)- वाहन चालकासह आरटीओ यांनी निर्धारित केलेली वाहनातील 50 टक्के प्रवासी क्षमता, बस- आरटीओ यांनी निर्धारित केलेली प्रवासी क्षमता. मात्र, उभे राहून प्रवास करण्यावर निर्बंध असतील. 
सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तींवर रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड करण्यात येईल. प्रत्येक प्रवासी वाहतूक फेरी झाल्यानंतर संबंधितांनी वाहनाचे निर्जंतुकीकरण करुन घेणे आवश्यक राहील. सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालक व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच 10 एप्रिल 2021 पासून चालक व कर्मचाऱ्यांनी 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. चालक व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन न घेतल्यास व कोविड-19 निगेटिव्ह RTPCR अहवाल सोबत न बाळगल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागामार्फत ही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रेल्वे स्थानकावर कोणीही प्रवासी विनामास्क फिरणार नाही, रेल्वेतील सर्वसाधारण बोगीत  कोणीही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही याची  दक्षता संबंधित स्टेशन मास्तरांनी घ्यावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पाचशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई स्टेशन मास्तरांनी करावयाची आहे.
                      कार्यालये : को-ऑपरेटिव्ह, पीएसयू व खासगी बँका, BSE/NSE, इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी, टेलिकॉम सेवा पुरवठादार, विमा, मेडिक्लेम कंपनी, औषधी  वितरण/निर्मिती संबंधित कार्यालये वगळून इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतीबाबत कार्यालयप्रमुखांनी कोविड-19 प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावयाचा आहे. वीज, पाणी , बँकिंग व इतर वित्तीय सेवा देणारे कार्यालये 100 टक्के अधिकारी, कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील बैठका एकाच कार्यालयात असतील, तर ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात. सर्व शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणा-या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रणासाठी अभ्यागतांना शासकीय कार्यालयात प्रवेश असणार नाही. सर्व कार्यालयांनी e-visitor प्रणालीचा वापर करावा. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविले असेल त्या संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी अशा व्यक्तींकडे 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह  अहवाल असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. तसेच निगेटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तीस संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी प्रवेश पास दिल्यानंतरच कार्यालयात प्रवेश द्यावा. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड-19 लसीकरण करुन घ्यावे. खासगी वाहतूक व्यवस्था : खासगी वाहने, खासगी बस यांना केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपावेतो वाहतूक करता येईल. तसेच 30 एप्रिल 2021 पर्यंत शुक्रवार रात्री 8 वाजेपासून ते सोमवार सकाळी 7  वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त वाहतूक करण्यास मनाई असेल. खासगी  बसमध्ये आरटीओद्वारे निर्धारीत केलेल्या आसन क्षमतेसह वाहतूक करता येईल. मात्र, अशा बसमध्ये कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करणार नाही. खासगी बसमधील वाहन चालक व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच 10 एप्रिल 2021 पासून खासगी बसमधील वाहन चालक व कर्मचाऱ्यांनी 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
                     करमणूक व मनोरंजन सुविधा : सर्व सिनेमा हॉल, ड्रामा थिएटर, सभागृह, मनोरंजन पार्क, आर्केड्स, व्हीडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्लब, स्वीमिंग पूल, जिम व स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद राहतील. या आस्थापनाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. चित्रपट, मालिका, जाहिरात इत्यादींचे शूटिंग करताना शक्यतो गर्दी होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. यासंबंधित सर्व कर्मचारी व कलावंतांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच 10 एप्रिल 2021 पासून सर्व संबंधित कलाकार व कर्मचाऱ्यांनी 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट  सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स : सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स व बार बंद राहतील. सर्व रेस्टॉरंट / हॉटेल्स मालकांना टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सुविधा केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत देता येईल. तसेच शनिवार व रविवारी केवळ सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी  सुविधा देता येईल. हॉटेलमधील रेस्टॉरंट व बार हे केवळ in-house guest करीता सुरु राहतील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत oustside guest यांना परवानगी असणार नाही. होम डि‍लिव्हरी सुविधा पुरविणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
                         कोविड -19 लसीकरण करुन न घेतलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट नसलेल्या कर्मचाऱ्यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. संबंधित हॉटेल/ रेस्टॉरंटवर रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच पुन्हा अशीच चूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात येईल. अशा प्रकारे दंडात्मक कारवाई अन्न प्रशासन, पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावयाची आहे.
                     धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे : सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे हे नियमित पूजा अर्चा वगळता बंदच राहतील. सर्व धार्मिक स्थळांच्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करता येईल. मात्र, बाहेरील अभ्यातगतांना प्रवेश करण्यास मनाई राहील. या कर्मचाऱ्यांनीही कोविड लसीकरण करुन घ्यावे. बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर : बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर इत्यादी आस्थापना बंदच राहतील. तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. सर्व वृत्तपत्रांना छपाई करुन वितरण करता येईल. सर्व वृत्तपत्रे हे दररोज सकाळी 7 ते रात्री 8  वाजेपर्यंत वितरीत करता येतील. या आस्थापनांशी निगडित कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
                  शाळा व महाविद्यालये : सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद राहतील. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 48 तासांच्या आत केलेले कोविड-19 RTPCR चाचणी निगेटिव्ह अहवाल  सोबत बाळगणे अनिवार्य राहील. महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही बोर्ड/यूनिवर्सिटीमार्फत किंवा बाह्य प्राधिकरणामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी त्या - त्या विभागाच्या परवानगीने व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांच्या संमतीने परीक्षेस जाण्यास परवानगी राहील. खासगी  शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. संबंधितांनीही कोविड लसीकरण करुन घ्यावे.
                  धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम : सर्व प्रकारचे धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी असेल. निवडणुकींच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जागेमध्ये 50 व्यक्ती किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत परवानगी देण्यात येईल. बंदिस्त जागेच्या 200 लोकांच्या पेक्षा कमी किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत असे कार्यक्रम घेण्यास कोविड-19 च्या निर्देशानुसार परवानगी देण्यात येईल. सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत जिल्हाधिकारी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवतील. या  निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास सदर परिसराच्या मालकास जबाबदार धरुन आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडास पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना या कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपर्यंत बंद ठेवण्यात येतील. एखाद्या उमेदवाराकडून प्रतिबंधात्मक आदेशांचे 2 पेक्षा अधिक वेळा उल्लंघन केल्यास राजकीय मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. रॅली, कोपरा सभा व इतर कार्यक्रमांसाठी कोविड-19 संदर्भातील प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या सर्वांनी  निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
                       लग्न समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम : लग्न व इतर समारंभ हे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन साजरे करावेत. लग्न समारंभास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपये दंडाची  आकारणी  करण्यात येईल, तर आस्थापनेवर दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे वारंवार उल्लंघन केल्यास सदरची जागा सील करण्यात येईल. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपर्यंत बंद ठेवण्यात येतील. अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल. अंत्यविधीस येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लसीकरण केलेले असावे. लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
                    उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री : उघड्यावर कोणासही खाद्यपदार्थांची व्रिकी करता येणार नाही. मात्र, पार्सल किंवा होम डिलिव्हरी सुविधा रोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत देता येईल. पार्सल सुविधा देताना ग्राहकांनी  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपर्यंत बंद ठेवण्यात येतील. प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घ्यावे. कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणी निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेवर अन्न प्रशासन, पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
                   उत्पादन करणाऱ्या आस्थापना, कंपन्या घटक : कारखाने व उत्पादन करणाऱ्या आस्थापनेच्या प्रवेशाच्या ठिकाणी सर्व कामगारांचे थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजणे आवश्यक राहील. वरील ठिकाणी काम करणारे सर्व कामागर, कर्मचारी, मालकासह चालकांनी लसीकरण करुन घ्यावे. कोणताही कामगार कोविड-19 बाधित असल्याचे आढळून आल्यास अशा कामगारास Quarantine करावे. त्याचे वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे.  ज्या कारखान्यात, कंपनीत 500 पेक्षा जास्त कर्मचारी  काम करीत असतील, अशा ठिकाणी  कंपनी, कारखाने, आस्थापनांनी  स्वतंत्र Quarantine सेंटर उभारावे. एखादा कर्मचारी कोविड-19 बाधित आढळल्यास आस्थापना बंद करुन निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. लंच व टी- ब्रेक मध्ये एकाच वेळी होणारी कामगारांची गर्दी नियंत्रित करावी. तसेच जेवणाचे ठिकाण सामाईक असू नये. सामूहिक स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुकीकरण करावीत.  लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी 15 दिवस वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.  एखादा कर्मचारी वैद्यकीय रजेवर असल्यास किंवा बाधित झाल्यास त्यास कामावरुन कमी करू नये. त्याचे वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे.

                      ऑक्सिजन (Oxygen) पुरवठादार : कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा उपयोग असणाऱ्या कोणत्याही औद्योगिक प्रक्रियेस 10 एप्रिल 2021 नंतर अनुमती असणार नाही.  अशी प्रक्रिया सुरू ठेवण्यास  इच्छुक असलेला औद्योगिक आस्थापनानी परवाना देणार्या  प्राधिकरणाकडे कारणे स्पष्ट करीत उत्पादन/प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी परवानगी घेणे आवशयक राहील. सर्व परवाना देणार्याे अधिकाऱ्यांनीदेखील याची नोंद घ्यावी. अशा औद्योगिक आस्थापनांनी एकतर 10 एप्रिल 2021 पर्यंत प्रक्रिया थांबवावी किंवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक  परवानगी घ्यावी. ऑक्सिजनचे सर्व उत्पादक उत्पादक त्यांचे 80% उत्पादन (वास्तविक तसेच एकूण क्षमतेच्या) वैद्यकीय किंवा औषधी उपयोगासाठी राखून ठेवतील  त्यांनी  10 एप्रिल 2021 नंतर त्यांचे ग्राहक आणि  पुरवलेल्या ऑक्सिजनच्या वापरकर्त्यांची माहिती जाहीर करणे बंधनकारक असेल.
                      E-Commerce : ई- कॉमर्सशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या ई- कॉमर्स आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात येईल.
                   को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी : सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाचपेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण आढळून आल्यास तेथे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro-Containment Zone) घोषित करण्यात येईल. तेथे मोठ्या अक्षरातील फलक लावावा. तेथे अभ्यागतांना प्रवेश असणार नाही. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या (Micro-Containment Zone) ठिकाणी  प्रवेश करणे व निर्गमनाच्या बाबतीत प्रतिबंधाची जबाबदारी संस्थेची राहील. या  सूचनांचे पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्या सोसायटीस दहा हजार रुपये दंड करण्यात येईल. त्यानंतर जास्तीत जास्त दंडाच्या आकारणीबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. सर्व संबंधित हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन यांनी  सोसायटीच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची RTPCR  चाचणी  करुन घेणे आवश्यक राहील. तसेच कोविड लसीकरण करुन घ्यावे.
              बांधकाम : ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची  सुविधा उपलब्ध आहे, अशीच बांधकामे सुरू राहतील. कामगारांना ये-जा करण्यास बंदी राहील. मात्र, बांधकाम साहित्याची  ने-आण करण्यास मुभा राहील. बांधकामाच्या ठिकाणातील सर्व कामगार, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेला कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकास रुपये 10000/- मात्र दंडाची  आकारणी  करण्यात येईल. पुन्हा उल्लंघन केल्यास सदरचे बांधकाम कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. कोणताही कामगार कोविड-19 बाधित असल्याचे आढळून आल्यास अशा कामगारास Quarantine करावे. त्याचे वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे. शासनाच्या 27 मार्च 2021 रोजीच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाया या आदेशास देखील लागू राहतील. सर्व प्रकारचा जमा झालेला दंड संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांनी नियंत्रण व कोविड-19 बाबतच्या उपचारासाठी वापरण्यात येईल. वरील निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील. हा आदेश सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 30 एप्रिल 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19)  उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने