दोंडाईचा: शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात कोरोनाने प्रचंड थैमान घातले असून निमगुळ गावात मागील ३ आठवड्यात १९७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर १५ जण दगावले आहेत. आज एकाच दिवसांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत आरोग्य यंत्रणाने अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केल्यानंतर आज प्रशासन गतिमानतेने कामाला लागले आहे.
कोरोनाने नवीन निमगुळ गावात हाहाकार माजवला असून संपूर्ण गाव यामुळे भयभीत झाले गावाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत आहे. अश्या पार्श्वभूमीवर निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्याचा मोठा ताण पडत असून ती यंत्रणा कमी पडत असल्याची तक्रार आ. रावल यांच्या कडे करण्यात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याना त्याबाबत माहिती दिली व जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी प्रांताधिकारी विक्रम बांदल व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले असून गावातील परिस्थितीतचा आढावा ते घेणार आहेत. गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील ते लक्षात घेवून गावात प्रत्येक घरात सर्वेक्षण मोहीम राबविणे, टेस्टींग वाढवणे, ट्रेसिंग वाढवणे, वेळोवेळी गाव सॅनेटराईज करणे, कोरोनाची लक्षणे वाटल्यास रॅपिड ॲंटीजेन टेस्ट करावी, दोंडाईचा उपजिल्हारुग्णालयात बेड संख्या वाढवावी अश्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
*दोंडाईचातही उपाययोजना करण्याची गरज..*
दोंडाईचा शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यासाठीही उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करावे, बेड संख्या वाढवावी, डॉक्टर संख्या वाढवावी या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.
Tags
news
