नंदुरबार-नंदुरबारात पत्रकार भवन व्हावे, हे माझे आधीपासूनचे स्वप्न होते. दुर्दैवाने काही कारणास्तव ते पूर्ण झाले नाही. परंतू नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्यासह सर्व पत्रकारांच्या सहकार्याने आज पत्रकार भवन उभे राहिले आहे. पत्रकार दिनाचा कार्यक्रम पत्रकार भवनात होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, पत्रकारांच्या सद्याच्या परिस्थितीला स्वतः पत्रकार जवाबदार आहेत. पत्रकारांनी आपापले हेवेदावे विसरुन एकत्र आल्यास सर्वांची प्रगती होईल आणि पत्रकारांना येणार्या समस्याही सुटतील, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे काल दि.६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम नेहरु नगर येथील नुतन पत्रकार भवनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, पत्रकार दीपक कुलकर्णी, राकेश कलाल, धनराज माळी, संघाचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, जीवन पाटील, धर्मेंद्र पाटील, रविंद्र चव्हाण, गजेंद्र शिंपी, विशाल माळी, हंसराज चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. प्रास्ताविकेत संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी आपल्या कार्यकाळातील जमाखर्चाचा हिशोब सर्वांना सादर केला. यावेळी ते म्हणाले, आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाला हे नुतन पत्रकार भवन मिळाले आहे. पत्रकारांचे भवन व्हावे, यासाठी स्थानिक नगरसेवक कुणाल वसावे व कैलास पाटील यांनीही प्रयत्न केले असून त्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानतो. माझ्या कार्यकाळात पत्रकार भवन झाले, याचा मला अभिमान आहे. पत्रकार संघासाठी खुर्ची, भवनाची पीओपी, विद्युत फिटींग, फर्निचर आदी कामांना सुरुवात झाली असून एक सर्वसुविधायुक्त पत्रकार भवन नंदुरबारात असणार आहे. भविष्यात बाहेर गावातील पत्रकारांना मुक्कामाच्या सोयीसाठी रुमचीही व्यवस्था करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पत्रकार निलेश पवार यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन वर्षात सर्व पत्रकारांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. तळागाळातील सर्व पत्रकारांचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. गजेंद्र शिंपी म्हणाले की, नंदुरबार शहरातील पत्रकारिता ब्लॅकबोर्डवर सुरुवात झाल्याचे सांगून त्या काळातील वृत्तपत्र, पत्रकार याबाबत सविस्तर माहिती दिली. दिपक कुलकर्णी म्हणाले, की उद्याचा भविष्यकाळ फार वाईट असून पत्रकारितेची स्थिती पाहून त्यातून आपण वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. धर्मेंद्र पाटील म्हणाले, की पत्रकारांनी खोट्या दुनियेत न जगता वास्तविक परिस्थितीत जगावे. पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली पत्रकार संघाचे भवन राहिले ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेवून पत्रकार संघाचा पारदर्शीपणे कारभार चालविला आहे. त्यामुळे यापुढेही त्यांच्यासोबत सर्व पत्रकारांनी उभे रहावे, असे आवाहन केले. तळोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी सांगितले की, पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात सर्व पत्रकार उपस्थित राहिले. त्याबद्दल आनंद वाटत आहे. ज्याप्रमाणे हा कार्यक्रम झाला, असाच कार्यक्रम तळोदा येथे घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघाने तालुका स्तरावर बैठका घेतल्यास जिल्ह्यातील पत्रकार व तालुका स्तरावरील पत्रकारांमध्ये समन्वय वाढेल, अशी सुचना त्यांनी मांडली. सूत्रसंचालन पत्रकार रणजित राजपूत यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. तर आभार रमेश महाजन यांनी मानले. कार्यक्रमास मनोज शेलार, भुषण रामराजे, राजु पाटील, नितीन पाटील, सुनिल कुलकर्णी, महेश पाटील, अविनाश भामरे, जगदिश सोनवणे, देवेंद्र बोरसे, महादू हिरणवाळे, तळोदा पत्रकार संघाचे सुधाकर मराठे, ईश्वर मराठे, चेतन इंगळे, अक्षय जोहरी, जगदिश ठाकूर, जितेंद्र जाधव, राजेंद्र पवार, दिलीप बडगुजर, किसन जाधव, ज्ञानेश्वर माळी, प्रल्हाद आल्हाट, सतिष गोसावी, शैलेंद्र ईशी, बापू ठाकरे, शैलेंद्र चौधरी, सुभाष राजपूत, अतुल चौधरी, पंकज सिंधी, हिरालाल मराठे, प्रशांत पाटील, इमरान पिंजारी, हाश्मी, प्रेमचंद राजपूत आदी पत्रकार बांधव उपस्थित हाेते.
Tags
news
