शिरपुरात भव्य सायकल रॅली चे आयोजन, कोरोना व पर्यावरण जनजागृती साठी प्रशासनाचे नागरिकांना आवाहन




शिरपूर  - शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी नागरीकांना शिरपूर प्रशासन यांचे कडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे की,  कोरोना संक्रमणाचा पुन्हा होणारा उद्भव आणि  पर्यावरण जागृती यासाठी शिरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने शहरात गुरुवार दि. २४ डीसेंबर २०२० रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना पुन्हा डोके वर काढतो आहे . या काळात नागरीकांनी संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे मात्र या सूचनेचे पालन नागरीक गांभीर्याने करत नाहीत. याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
स्वयंचलित वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रदूषण , धूराचे प्रमाण वाढत  आहे. त्यातून निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी सायकलसारख्या प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.  याच हेतूने शिरपूर शहरात प्रांताधिकारी कार्यालय, डीवायएसपी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन , पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्यासह शहरातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक संघटना, युवक मंडळे, व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर शहरातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २४/१२/२०२० रोजी सकाळी आठ  वाजता शिरपूर तहसीलदार कार्यालय येथून या रॅलीस सुरुवात होणार असून कॉटेज हॉस्पीटल, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर.सी.पटेल में बिल्डींग, अंबिकानगर, बौध्द समाज मंदीर चौक, स्वामी रेडीयम चौक, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाचकंदील, मारवाडी गल्ली,कुंभारटेक मार्गे  ही रॅली शिरपूर नगरपरिषद कार्यालयात पोचेल, येथे या रॅलीचा समारोप होईल.
      शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि आरोग्याबद्दल सजग असलेल्या नागरीकांनी या रॅलीत आपल्या सायकल सह आणि मास्क लावून सहभागी व्हावे आपल्या संघटनेचा, मंडळाचा बॅनर आपल्या सायकलवर लावावा. असे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय 
दर बुधवारी तालुक्यातील शासकिय कार्यालयात नो व्हेईकल डे  पाळला जाणार आहे. या दिवशी शासकिय कर्मचारी कार्यालयात येण्यासाठी सायकलने किंवा पायी येणारआहेत. नागरीकांनी देखील दर बुधवार नो व्हेईकल डे म्हणून पाळला तर आपण  आपले शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लागेल.
नागरीकांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे. असे आवाहन डॉ. विक्रम बांदल ( उपविभागीय अधिकारी, शिरपूर),
अनिल माने ( उपविभागीय पोलीस अधिकारी), आबा महाजन ( तहसीलदार, शिरपूर),अमोल बागूल ( मुख्याधिकारी, नगर परिषद, शिरपूर ),हेमंत पाटील ( पोलीस निरीक्षक, शिरपूर )युवराज शिंदे ( गटविकास अधिकारी, शिरपूर) यांनी केले आहे.   

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने