विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सूक्ष्म नियोजन करावे : उपायुक्त अरुण आनंदकर




धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त अरुण आनंदकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 
उपायुक्त श्री. आनंदकर आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या दालनात जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण (भूसंपादन) उपस्थित होते. 
उपायुक्त श्री. चिंचकर म्हणाले, या निवडणुकीचा प्रचार 29 नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त होईल. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर थर्मल गन, ऑक्सिमीटर, मास्क, सॅनेटायझर आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी सांगितले, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र असेल. तेथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग ही पार पडला आहे. मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात होईल, असे सांगितले. 
मतमोजणी केंद्राची पाहणी
या बैठकीनंतर उपायुक्त श्री. आनंदकर यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून विविध सूचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने