तो पुन्हा येईल
संपादकीय
महेंद्रसिंह राजपूत
महाराष्ट्र राज्याला मी पुन्हा येईल हा शब्द नवीन नाही, मी पुन्हा येईल या वाक्याला सबंध महाराष्ट्र परिचित आहे, केवळ मी पुन्हा येईल या एका वाक्यावर राजकीय पटलावर मागील काळात फार मोठे महाभारत घडले हा भाग वेगळा की मी पुन्हा येईन म्हणणार्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांना पुन्हा यायची संधी उपलब्ध झाली नाही, मात्र राजकीय अट्टाहास का असेना पण मी पुन्हा येईल या वाक्यात महाराष्ट्रात राजकीय वादळ माजले होते.
आता राज्याच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा तो पुन्हा येईल अशा आशयाचे चित्र निर्माण झाले आहे .आपण सर्वांना सर्वश्रुत आहे की महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना या आजाराची लागण झाली आणि 22 मार्च पासून सहा ते सात महिने महाराष्ट्र लॉकडाऊन होता .या काळात मानवाला मानवाची किंमत कळली ,मनुष्य जीवन किती अनमोल आहे याची प्रचिती आली आणि आपल्याकडे कितीही धनसंपत्ती असेल तरी आपण निसर्ग नियमांपुढे आपण नगण्य आहोत याची देखील जाणीव झाली. सुदैवाने मागील महिन्यात कोरोना ची आकडेवारी कमी होऊन हळूहळू महाराष्ट्र पूर्वपदावर येत असतानाच डिसेंबर महिन्याच्या उंबरठ्यावर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आता तो आपणास मी पुन्हा येईल असे आव्हान देत आहे.
मागील महिन्यात दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली, सोबत गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशात देखील त्यांने डोके वर काढले, जागतिक पातळीवर देखील अनेक देशात कोरोना पुन्हा एकदा दुसरी लाट निर्माण केली .आज महाराष्ट्र सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत असले तरी जर कोरोना ने आपला अट्टाहास पूर्ण केला आणि मी पुन्हा येईल असे म्हणत आला अशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्यातील जनतेच्या जीवास परत एकदा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकांना पुन्हा एकदा लॉकडाऊन
होईल की काय अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र शासनस्तरावरून कोरोना ची दुसरी लाट येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली असली तरी नागरिकांच्या मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही .कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नसताना राज्यातील जनता बिनधास्तपणे रस्त्यावरून फिरत आहे, शिवाय शासन नियमांचे उल्लंघन देखील करत आहे. दिवसेंदिवस आपण पाहतो की सोशल डिस्टंसिंग फार मोठा फज्जा उडत आहे . एका ही राजकीय पक्ष व सोशल डिस्टनसिंग चे पालन करत नाही, विविध निवेदन, आंदोलन करते वेळो सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. लोक सुद्धा मास्क, सॅनिटायझर यासारखे सामान्य नियम सुद्धा आता पाळत नाहीत आणि विना मास्क बाहेर फिरताना दिसत आहे .त्यामुळे कोरोना येऊ नये ही जेवढी महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे त्यापेक्षा अधिक तुमची व आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. संकटाच्या काळात आपण जबाबदारीचे भान ठेवून शासन नियमांचे पालन करून वागणूक केली पाहिजे अन्यथा या संकटापासून तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही. आरोग्य यंत्रणेकडून या महाभयंकर आजारावर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून किमान लस येईपर्यंत तरी पूर्णपणे जनजीवन सामान्य होणे शक्य नाही आणि तोपर्यंत लोकांनी शासन नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे .लस निर्मितीनंतर देखील ती प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात फार मोठा कालावधी जाणार असून आता कोरोना काळात प्रत्येकाने आपल्या जिवाची पर्वा करूनच वाटचाल करावी असे दिशानिर्देश वारंवार दिले जात आहेत. कोरोना जरी आपले डोके वर काढत असला तरी तो येऊ नये यासाठी सर्वच प्रयत्नात आहेत मात्र योग्य ती खबरदारी घेण्याची गरज प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाची देखील आहे मागील काळात अचानक लॉकडाऊन लागल्याने अस्ताव्यस्त झालेले जन जनजीवन आजदेखील पूर्वपदावर आलेले नाही, त्यामुळे जर भविष्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन ची वेळ आली तर अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले जाईलच पण यात सामान्य माणसाची काय गत होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी त्यामुळे कमीत कमी आता सामान्य जनतेची आसमान से अटका आणि खजूर मे लटका अशी काही गत होऊ नये म्हणून वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे . कोरोना राज्याच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला असून तो मी पुन्हा येईल येईल असे संकेत देत आहे. राज्य आज जरी पूर्णपणे कोरोना मुक्त झाले नसले तरी बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे .किमान यापुढे तरी जोपर्यंत लस उपलब्ध होऊन प्रभावी उपचार होत नाही तोपर्यंत कोरोना ने पुन्हा येऊ नये आणि तो न यावा म्हणून आवश्यक त्या उपाययोजना निर्बंध यांच्या अवलंब केल्यानंतर त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सामान्य माणसाची आहे .म्हणून किमान आता आपण सर्वांनी मिळून एकजुटीने या आगामी काळात येणारा संकटाचा सामना करु आणि मानवी जीवनातून कोरोना ला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे .आणि तू कधीच येऊ नकोस आम्ही सज्ज आहोत हे दाखवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
Tags
news
