ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, अशी दक्षता घ्या! : जिल्हाधिकारी संजय यादव

 



जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूबाबत आढावा बैठक संपन्न

धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पैकी बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. हीच परिस्थिती राहिली, तर धुळे जिल्ह्याला दररोज किमान 60 लाख लिटर ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करतानाच पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (नोडल अधिकारी), जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या डॉ. ममता पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन महत्वाचा असून त्याचा पुरवठा नियमितपणे होईल, अशी दक्षता घेतली पाहिजे. आरोग्य यंत्रणेने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ऑक्सिजन समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हे ऑक्सिजनचे जिल्हास्तरावरील समन्वयक म्हणून काम पाहतील. ऑक्सिजन सिलिंडर रिकामे झाल्यानंतर ते भरून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. याशिवाय ज्यांच्याकडे सिलिंडर पडून असतील त्यांच्याकडूनही सिलिंडर तातडीने मागवून घेत ते भरून ठेवावेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ऑक्सिजन टँकची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कोरोना विषाणूबाधित संशयित रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत त्यांना अलगीकरण कक्षातच ठेवावे. तसेच स्वॅब घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कठोर उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.  यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी ऑक्सिजन युक्त बेड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक, प्रयोगशाळेसाठी आवश्यक मनुष्यबळ, बेड उपलब्धतेसाठी तयार केलेल्या मोबाईलचा वापर आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने