कालपर्यंत,
अज्ञानाच्या अंधाऱ्या कोठडीत तुझ्या
कित्येक पिढ्या गुदमरून मरत होत्या
आणि आज म्हणे,
तू ज्ञानाच्या गोष्टी करतोस
पण लक्षात ठेव
तुझ्या त्या ज्ञानमहालातील नंदादीप म्हणजे
माझी माय माता सावित्री
कालपर्यंत,
पशुहुनही हीन होत जगणं तुझं ना हक्क ना अधिकाऱ ना मागणं तुझं
आणि आज म्हणें शेकडोंना अधिकार बहाल करतोस ?
पण लक्षात ठेव,
तुझा अधिकार देण्याचाअधिकार म्हणजे
माझी माय माता सावित्री
कालपर्यंत गुलाम होऊन जगत होतास तू
जगण्यासाठी लाचारीने वागत होतास तू
आणि आज म्हणे
चार लोक सलाम ठोकतात तुला
पण लक्षात ठेव
तुझ्या जगण्याचा सन्मान म्हणजे माझी माय माता सावित्री
कालपर्यंत मोबदला नव्हता तुझ्या घामाचा
माणूस उरला होता फक्त नामाचा आणि आज म्हणे
तिजोऱ्या भरल्यास तू नोटांनी पण लक्षात ठेव
तुझ्या तिजोरीतील लक्ष्मी म्हणजे माझी माय माता सावित्री
कालपर्यंत सार्यांनाच होता द्वेष तुझा
देवळालाही नको होता प्रवेश तुझा
आणि आज म्हणे
घरात देवळे बांधलीस तू
पण लक्षात ठेव
तुझ्या देवळातला देव म्हणजे माझी माय माता सावित्री
कवी सुशील गव्हाणे
रा बामखेडा ,शहादा
Tags
news
