शिरपूर - शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, दि.२० सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संपूर्ण तालुक्यात रविवारी दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. यात सर्वच ठिकाणी शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून काही भागात वृक्ष देखील उन्मळून पडले.
तालुक्यात शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ऊस, कापूस, पपई, सोयाबीन, केळी, ज्वारी, बाजरी, मका व इतर अनेक खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे असे आमदार काशिराम पावरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.
शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व या सर्व पिकांचे पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर सहकार्य करावे असे निवेदन जिल्हाधिकारी संजय यादव यांना देण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील, वाघाडी माजी सरपंच ऍड. प्रतापराव पाटील, खर्दे पाथर्डे सरपंच सुनिल पाटील, जगन्नाथ पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की चौधरी, जितू सूर्यवंशी, मंगेश पाटील यांनी निवेदन दिले.
तसेच यापूर्वी शिरपूर तालुक्यात डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी देखील निवेदन देण्यात आले होते. त्याबाबत देखील अंमलबजावणी व्हावी असे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी पाठपुरावा करून शेतकरी बांधव यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.
Tags
news

