घरोघरी जाऊन कोरोनाबाबतचे सर्वेक्षण करा- डॉ.राजेंद्र भारुड



नंदुरबार दि.16: शासनाने कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही व्यापक मोहिम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून अतिजोखमीच्या व्यक्तिंचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

आरोग्य अधिकाऱ्यांसाठी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका आणि दोन सहकारी एका पथकात असतील. 25 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दरदिवशी 50 घरांचे एका पथकाने सर्वेक्षण करावयाचे आहे.5 ते 10 पथकामागे एका आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. आजाराची लक्षणे आढळताच आरोग्य अधिकाऱ्यांनी आवश्यक उचाराबाबत मार्गदर्शन करावे.
 
कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरात जावून ताप असलेले रुग्ण, गंभीर आजार असलेले व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती, कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आदींची माहिती घेण्यात  यावी. एखाद्या व्यक्तीत लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वॅब चाचणी मोबाईल टीमद्वारे करून घ्यावी. सर्वेक्षणाच्या वेळी कोरोनाची त्रिसूत्री नागरिकांना समजावून सांगावी. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर याचे महत्व नागरिकांना समजावून सांगावे. 

सर्वेक्षणाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था तालुका आरोग्य अधिकारी यांनी करावी. तसेच तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने आवश्यक साहित्य जिल्हास्तरावरून प्राप्त करून घ्यावे. सर्वेक्षण सुरू असताना कोरोनाबाबत नियमीत कामकाज सुरळीतपणे सुरू राहील याचीदेखील दक्षता घ्यावी. 
गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक पथकासोबत देण्यासाठी दोन स्वयंसेवकांची निवड करावी. स्वयंसेवक किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पथकाने केवळ माहिती न घेता कोरोनाचे परिणाम, घ्यावयाची दक्षता, नेहमीच्या आजारांसाठी नियमित औषधे घेण्याच्या सूचना द्याव्यात. या मोहिमेत लोकप्रतिनिधी आणि जनतेचा सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

गृह अलगीकरण केलेल्या बाधितांची ऑक्सिजन पातळी वेळेवर तपासणे व त्याच्या प्रकृतीची माहिती नियमित घेण्याकडे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष द्यावे. बाधितांची अधिक संख्या असलेल्या गावात अधिकाधिक स्वॅब चाचणी होण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावे. अशा गावातील अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार  आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही डॉ.भारुड म्हणाले. या मोहिमेमुळे कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यात मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत उपविभिागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने