धुळे जिल्ह्यात आधारभूत किंमतीवर मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरु होणार; जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या प्रयत्नांना यश



धुळे (प्रतिनिधी) : राज्याचे कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्या आदेशानुसार व शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या मागणीनुसार धुळे जिल्ह्यात आधारभूत किंमतीवर मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरु करण्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. लवकरच शिंदखेडा, शिरपूर, साक्री, येथे ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरु होतील. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. व्यापाऱ्यांना कमी किंमतीत मका व ज्वारीची विक्री करु नये. हमीभाव केंद्रात आधारभूत किंमतीवर विकावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमख हेमंत साळुंके यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत मका व ज्वारी खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरु करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहेत. यासंदर्भात श्री.साळुंके यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे दि. 9 मे पासून सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या या मागणीला यश आल्याचे कळताच मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्याने ज्वारी व मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी कोवीड-19 या आजाराने संपूर्ण जगात घातलेल्या थैमानामुळे धुळे जिल्ह्यात देखील लॉकडाऊन सुरु आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ज्वारी व मका, व्यापारी अत्यंत कवडीमोल दराने विकत घेत आहेत. मका साधारणत: 800 ते 1000 रुपये प्रती क्विटल आणि ज्वारी 1500 ते 1700 रुपये प्रती क्विंटल दराने विक्री केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत होते. अशा संकटसमयी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याहेतु शासनाने मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात श्री.साळुंके यांनी  महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे दि. 09 मे 2020 रोजी ऑनलाईन पत्रव्यवहार केला होता. त्या मागणीचा पाठपुरावा म्हणून दूरध्वनीवरुन संभाषण केले जात होते. श्री.भुसे यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणावरुन त्यांनी हमीभाव खरेदी केंद्रास तत्वत: मंजुरी मागील आठवड्यात दिली होती. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने श्री.साळुंके यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे हमीभाव केंद्र सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पुरवठा अधिकारी यांनी शिंदखेडा, शिरपूर व साक्री येथे मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात अंतिम आदेश दिलेत. मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने श्री.साळुंके यांच्या मागणीस यश आले आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रात आधारभूत किंमतीवर मका व ज्वारीची विक्री करावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने