शिरपूर - कोविड - 19 आजारामुळे अतिशय अडचणीच्या काळात लोक जीवन जगत आहेत. सद्य परिस्थितीत अनेक नागरिक बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नाही. सर्व व्यवसाय, व्यवहार ठप्प झाल्याने सर्वच जनता अडचणींचा सामना करत आहे. येणाऱ्या पाणीपट्टी मुळे नगर परिषदेला फायदा तर नसतोच. तरीही फायदा, तोटा लक्षात घेण्याची ही वेळ नाही. म्हणून, सर्वसामान्य जनतेचा विचार करता पाणीपट्टी दरात सवलत देण्याबाबत शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या दि. 14 मे रोजी होणाऱ्या स्थायी मिटींग मध्ये ठरविण्यात येईल. स्थायी मिटींग मध्ये सुधारित सवलतीचे पाणी पट्टी चे दर जाहीर करण्याबाबत विचार विनिमय करण्यात येईल. तसेच सर्वच नळ कनेक्शन धारकांना नगर परिषदेच्या 50 टक्के खर्चाने ऑटोमॅटिक "बॉल व्हॉल्व" बसवून देण्यात येणार असून यामुळे पाण्याची बचत व बील कमी होण्यास मदत होईल असे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना आजाराने सर्वदूर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरपूरकर जनता देखील अडचणीत असल्याची आम्हाला जाणीव असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वतीने पाणीपट्टी दरात काही प्रमाणात सूट देण्याबाबत गुरुवारी दि. 14 मे रोजी होणाऱ्या स्थायी कमिटीच्या मिटींग मध्ये विचार विनिमय करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील सर्व नळ कनेक्शन धारकांना अतिशय चांगल्या कंपनीचे वॉल कॉक बसवून देण्यात येतील. यामुळे पाण्याची नासाळी थांबेल, अनावश्यक पाणी वाया जाणार नाही. ऑटोमॅटिक "बॉल व्हॉल्व" बसविण्याचा 50 टक्के खर्चाचा आर्थिक भार नगर परिषद उचलणार असून उर्वरित 50 टक्के रक्कम नागरिकांकडून टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रात इतरत्र अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असतांना माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी दूरदृष्टीने केलेल्या पाण्याच्या नियोजनपूर्वक कामातून शिरपूरला आजपर्यंत कधीही पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. शिरपूरच्या नागरिकांना आजपर्यंत कधीही पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नाही.
शिरपूर शहरात भर उन्हाळ्यात नियमितपणे सकाळी 3 तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. करवंद जॅकवेल येथून पाणी पुरवठा बंद असतांना देखील शहरात नियमित पाणी पुरवठा केला जात आहे. अतिशय चोखपणे नगर परिषदे मार्फत पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे असेही नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी स्पष्ट केले.
