शिरपूर - शिरपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विद्यार्थी व इतर अनेक जण हे विविध जिल्ह्यात व परराज्यात अडकलेले आहेत. त्या सर्वांना परत आणण्यासाठी आमदार काशिराम पावरा हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
आमदार काशिराम पावरा यांनी शुक्रवारी दि. 8 मे रोजी पुन्हा धुळे येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन पाठपुरावा केला. सोबत गुजराथ येथे अडकलेल्या शेकडो मजुरांची यादी, तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, लातूर, नाशिक, तसेच अनेक ठिकाणी अडकलेल्या मंजूर, विद्यार्थी व नागरिक यांची यादी सादर केली. या सर्व यादीनुसार सर्वांना शिरपूर येथे येण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ना हरकत प्रमाणपत्र (एन ओ सी) दिले. त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली असून त्यांना आणण्याचे काम सुरू झाले आहे. यातील काही आज रात्री तर काही सकाळी व काही येत्या दोन दिवसात शिरपूर तालुक्यात पोहचतील. याकामी काही ठिकाणी एसटी बसेस तर काही ठिकाणी आदिवासी विभागा मार्फत व्यवस्था करण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील असंख्य मजूर कामगार हे वीटकाम, बांधकाम गवंडी, शेतीकाम, ऊसतोड व अनेक कामे करण्यासाठी परजिल्ह्यात व परजिल्ह्यात मोठ्या संख्येने गेलेले आहेत. तसेच असंख्य विद्यार्थी व अनेक नागरिक हे देखील बाहेरगावी अडकले आहेत. सर्वांना ऑनलाईन अर्ज करणे हे शक्य नाही. अनेक जण फारच अडचणीच्या ठिकाणी असून त्यांना ऑनलाईन अर्जासह इतर कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य होतच नाही. अशा अनेक लोकांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच बाहेर असलेल्या मजुरांची यादी मंजूर करून जिल्हाधिकारी संजय यादव यांनी त्या सर्वांना आणण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी.) प्रत्यक्ष आमदार काशिराम पावरा यांच्याकडे आजच सुपूर्द केले. या सर्व बाबींसाठी वैद्यकीय तपासणी करून तसे वैद्यकीय प्रमाणपत्रे सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इतर अजून कोणाला ई पास बाबत माहितीसाठी पुढील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रवासी पास बाबत नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातून इतर राज्यात जाण्यासाठी श्रीमती प्रज्ञा बडे (जिल्हा पुनर्वसन अधिकारी धुळे) 78880 37189 व किशोर घोडके (जिल्हा खनिकर्म अधिकारी धुळे) 94051 97840), मुंबई व कोकण विभागात जाण्यासाठी पास मिळण्यासाठी प्रमोद भामरे उपजिल्हाधिकारी 75880 95799 व मिलिंद कोल्हे तहसीलदार 86685 54107. पुणे विभाग (पुणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) साठी तसेच नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार साठी या विभागात जाण्यासाठी श्रीमती सुरेखा चव्हाण उपजिल्हाधिकारी भूसंपादन 77092 77615 व श्रीमती सुचिता चव्हाण तहसीलदार 99700 88977. अमरावती, औरंगाबाद, नागपूर विभागात जाण्यासाठी गोविंद दाणेज उपजिल्हाधिकारी रोहयो 94221 52058 व संजय बोरसे जिल्हा समन्वयक जिल्हा स्तरीय वनहक्क समिती धुळे 94234 93391 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
