मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज 17 मे रोजी संपत असून त्यासंदर्भात केंद्र आज गाईडलाईन्स देखील जारी करणार आहे. राज्य सरकारने मात्र लॉकडाऊनबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटले आहे. या बाबत कोण कोणत्या नियम अटी व सवलत असतील या बाबत केंद्र सरकार दिशा निर्देश आल्यानंतर राज्य या बाबत अधीक सविस्तर लॉक डाऊन बाबत नियम जाहीर करणार आहे.
